नवजात बाळांच्या विक्री रॅकेटची पाळेमुळे शेजारच्या राज्यांमध्येही
By योगेश पांडे | Published: December 1, 2022 10:45 AM2022-12-01T10:45:06+5:302022-12-01T10:47:29+5:30
दत्तक विधानाचे बहाणे, खोट्या आजारांचा बनाव, बनावट मेडिकल सर्टिफिकेटचा वापर
नागपूर : डिप्टी सिग्नल परिसरात शेजारच्या प्रजापती दाम्पत्यानेच आठ महिन्यांच्या मुलाचे अपहरण केल्याच्या घटनेच्या तपासात अशाप्रकारे नवजात बाळांच्या विक्रीचे आंतरराज्य रॅकेट उघडकीस आले आहे. श्वेता खान ही या रॅकेटची सूत्रधार असून, गरीब घरातील तसेच अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलांची ती दत्तक देण्याच्या नावाखाली विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्ये आणि छत्तीसगड, तेलंगण, गुजरात या राज्यांमध्ये विकत असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.
नवजात बाळांच्या विक्रीच्या या रॅकेटचा संबंध गरिबीशी तसेच दत्तक विधान प्रक्रियेशी असल्याने त्याची पाळेमुळे खोलवर असावीत, असा संशय आहे. त्यामुळे नागपूरचे समाजमन हादरले आहे. प्रजापती दाम्पत्याने अपहरण केलेल्या मुलासह अशी एकूण सात मुले विकली गेल्याचे आतापर्यंत उजेडात आले असून रिटा व ईश्वर प्रजापती हे दाम्पत्य, श्वेता खान, राजश्री सेन, सचिन पाटील वगैरे मिळून दहाहून अधिकजण अटकेत आहेत. दत्तक प्रक्रियेत पैशाचा संबंध येत नसल्याने त्या बाळांना कसले तरी आजार असल्याचे सांगून इच्छुक दाम्पत्यांकडून मोठ्या रकमा उकळल्या जात होत्या आणि त्यासाठी प्रवीण बैस नावाचा डॉक्टर आवश्यक ती मेडिकल सर्टिफिकेट द्यायचा, असे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या रॅकेटची सूत्रधार श्वेता खान ही आधी नर्स म्हणून काम करायची. त्यामुळे वेगवेगळ्या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांशी तिचा परिचय होता. या ओळखीचा फायदा घेऊन ती गरीब, गरजू महिला किंवा अनैतिक संबंधांतून गर्भधारणा झालेल्या महिलांचे अचूक सावज हेरायची. साथीदारांच्या मदतीने त्यांना पैशाचे आमिष दाखवायची. यासाठी तिने काही एजंटस्देखील तयार केले होते. ते एजंट दत्तक बाळांचा शोध घेणाऱ्या निपुत्रिक दाम्पत्यांचा शोध घ्यायचे. या दाम्पत्यांशी संपर्क झाला की त्यानंतर ती संपूर्ण दत्तक प्रक्रिया पार पडल्यावर बाळ सोपविण्यात येईल, असा बनाव करायची. त्यासाठी जन्माचे प्रमाणपत्र व इतर दस्तऐवज देण्यात येतील, असे सांगायची. या प्रक्रियेचा खर्च तसेच बाळांच्या उपचारासह इतर कारणे देऊन ती दाम्पत्यांना लाखो रुपये मागायची व त्यानंतर गरीब महिलेकडून मूल घेऊन ते त्यांना सोपवायची.
- रॅकेटची मोडस ऑपरेंडी
- गरीब, गरजू तसेच अनैतिक संबंधांतील गर्भवतींचे सावज हेरायचे
- एजंटच्या माध्यमातून निपुत्रिक दाम्पत्यांचा शोध घ्यायचा
- दत्तक प्रक्रियेच्या नावाखाली बाळाची देवाणघेवाण ठरवायची
- दवाखान्याचा खर्च असल्याचे सांगून पैशांची मागणी करायची
- त्यासाठी डॉक्टरकडून घेतलेली बनावट मेडिकल सर्टिफिकेट वापरायची
८ बाय ८ चे क्लिनिक अन् आजाराचा बनाव
धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात प्रथमच प्रवीण बैस नावाच्या डॉक्टरचे नाव समोर आले आहे. महाकाळकर सभागृहाजवळ एका डोळ्याच्या दवाखान्याच्या बाजूलाच त्याने ८ बाय ८ च्या खोलीत क्लिनिक थाटले. खोलीवर कुठलाही फलकदेखील लावला नाही. श्वेता खानने विकलेल्या बाळांची तपासणी या क्लिनिकमधूनच होत असावी, असा संशय आहे. डॉ. बैसने अहमदाबादमधील सुलतयानी दाम्पत्याला सांगितले, की ते दत्तक घेणार असलेल्या चार दिवसांच्या मुलीची थॅलेसेमिया तपासणी करावी लागेल. तेव्हा त्या दाम्पत्याने बाळ घेण्याचा विचार बदलण्याची भूमिका घेतली. तेव्हा, या डॉक्टरनेच मध्यस्थी केली आणि तिच्या आईवडिलांना आजार नसल्याने तिला होणार नाही याची गॅरंटी घेतली, असे पोलिस तपासात समोर आले आहे.