नागपूर फ्लाइंग क्लबची तीन विमाने उड्डाणासाठी नव्याने सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 11:15 AM2021-03-26T11:15:52+5:302021-03-26T12:34:28+5:30
Nagpur news उड्डाण क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांसाठी नागपूर फ्लाइंग क्लब नव्याने सज्ज होत असून, नागरी विमान उड्डयण संचालनालय (डीजीसीए) परवानगीने तीन विमानांचे तपासणीपूर्व उड्डाण यशस्वी झाले आहे. तीनही विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उड्डाण क्षेत्रात करिअर करणाऱ्या युवकांसाठी नागपूर फ्लाइंग क्लब नव्याने सज्ज होत असून, नागरी विमान उड्डयण संचालनालय (डीजीसीए) परवानगीने तीन विमानांचे तपासणीपूर्व उड्डाण यशस्वी झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर तीनही विमाने प्रशिक्षणासाठी सज्ज झाली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी गुरुवारी दिली.
विमानतळ परिसरातील नागपूर फ्लाइंग क्लबच्या हँगरमधून विमानतळ धावपट्टीपर्यंत व त्यानंतर या तीनही विमानाने आकाशात झेप घेतली. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ विविध पद्धतीने उपलब्ध करून घेण्यात आले आहे. त्यामुळे डीजीसीएकडून उड्डाण प्रशिक्षण संघटना (एफसीओ) ही मान्यता प्राप्त करून घेण्यात येईल व त्यानंतर लवकरच विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.
नागपूर फ्लाइंग क्लबच्या संचालक मंडळातर्फे प्रारंभी तीन विमानांचे अनिवार्य असलेले पुअर एक्स्चेंज व एका विमानाचे स्ट्रीप इन्स्पेक्शन करण्यात आले. चारही विमाने मानकाप्रमाणे करून घेण्यात येऊन एनडीटी तपासणी करण्यात आली. त्यासोबतच हँगरचेसुद्धा नूतनीकरण करण्यात आले. विमानांसाठी अत्यावश्यक असलेले रेडिओ उपकरणांची दुरुस्ती सीएएमओचे नूतनीकरण आदी सुविधा नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले. त्यासोबत एरो क्लब ऑफ इंडियाच्या एरो मोबाइल लायसन्सचे डी - रजिस्ट्रेशन व रजिस्ट्रेशन करणे तसेच विमानांच्या चाचणीसाठी परवानगी घेतल्यानंतरच गुरुवारी नागपूर फ्लाइंग क्लबचे तीनही विमानाने यशस्वीरीत्या आकाशात उड्डाण केले. उड्डाण यशस्वी झाल्यासंबंधीचा अहवाल नागपूर उड्डाण विभागाच्या महासंचालकांना सादर करण्यात येणार आहे. महासंचालकांच्या मान्यतेनंतरच Airworthiness Redrew प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.
७४ वर्षांचा इतिहास
नागपूर फ्लाइंग क्लबची स्थापना १९४७मध्ये झाली असून, विदर्भातील महत्त्वाची संस्था म्हणून ओळख निर्माण झाली आहे. या क्लबतर्फे आतापर्यंत बरेच पायलट प्रशिक्षित झाले आहेत. उड्डाण क्षेत्रातील करिअर लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने या क्लबची (नागपूर फ्लाइंग क्लब प्रा. लि.) शासनाच्या मालकाची कंपनी म्हणून २१ डिसेंबर २००६ रोजी नोंदणी केली आहे. या कंपनीचे काम कंपनी ॲक्टनुसार सुरू आहे. फ्लाइंग क्लबकडे चार विमाने असून, त्यापैकी तीन विमाने सेसना १५२ श्रेणीतील, तर एक विमान १७२ श्रेणीतील आहे. यापैकी दोन विमाने क्लबच्या मालकीची आहेत. तसेच नवी दिल्लीच्या एरो क्लब ऑफ इंडिया यांच्याकडून करार तत्त्वावर दोन विमाने घेण्यात आली आहेत.