हळद सुकण्याआधीच तुटला साताजन्माचा फेरा, अपघातात नवदाम्पत्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 03:10 PM2022-01-31T15:10:22+5:302022-01-31T15:13:56+5:30
हिमांशू व निकिता महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. मात्र, त्यांचा संसार फुलण्याआधीच काळाने घाला घातला.
नागपूर : ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी ट्रेलरवर जाऊन धडकली. या अपघातात हिंगणा तालुक्यातील गुमगाव येथील पती-पत्नी मृत्यू झाला. ही घटना २९ जानेवारीला घडली.
हिमांशू देवानंद राऊत (वय २२) व निकिता हिमांशू राऊत (वय २१) असे या पती-पत्नीचे नाव आहे. ते दोघे महिनाभरापूर्वीच लग्नबेडीत अडकले होते. सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या या नवदाम्पत्याच्या जोडीला काळाची नजर लागली आणि होत्याचं नव्हतं झालं.
रुईखैरी शिवारातील हैद्राबाद-नागपूर मार्गाच्या दुरुस्तीचे कार्य सुरू असल्यामुळे नागपूर हैद्राबाद या मार्गाने एकतर्फा वाहतूक सुरू होती. हिमांशू हा पत्नीसह दुचाकीने नागपूर-चंद्रपूरमार्गे जात असताना त्याने एका वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचे दुचाकीवरील नियंत्रण बिघडले. यावेळी, ट्रेलर चालकाने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या ताब्यातील ट्रेलर हे रस्त्याच्या दुभाजकावर चढविले, मात्र त्याला यश आले नाही.
हिमांशूच्या दुचाकीचा वेग जास्त असल्याने दोघएही पती-पत्नी गंभीररित्या जखमी झाले. रस्त्याचे काम बघणाऱ्या ओरिएंटल कंपनीच्या टोल प्लाझावरील मेडिकल टीमने घटनास्थळाकडे तत्काळ धाव घेतली. जखमींना तत्काळ बुटीबोरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी हिमांशूला तपासून मृत घोषित केले. तर, निकिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेचा पुढील तपास बुटीबोरी पोलीस करीत आहेत.