‘कोरोना’च्या माहितीबाबत वर्तमानपत्रेच विश्वासार्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 12:57 PM2020-04-06T12:57:58+5:302020-04-06T12:58:53+5:30
‘व्हॉट्सअॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकीकडे ‘कोरोना’शी संपूर्ण जग लढत असताना दुसरीकडे योग्य माहिती व ‘फेक न्यूज’ असा सामना सुरू आहे. ‘व्हॉट्सअॅप’सह ‘सोशल मीडिया’वर क्षणाक्षणाला विविध ‘पोस्ट’ येत असताना नागपूरकरांना मात्र वृत्तपत्रांसह मुद्रित माध्यमांमध्ये येणारी ‘कोरोना’ची माहिती हीच सर्वाधिक विश्वासार्ह वाटत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर विविध माहिती, सल्ले, आवाहन इत्यादी विविध माध्यमातून समोर येत आहे. यात प्रामुख्याने वृत्तपत्रे (डिजिटल कॉपीसह), वृत्तवाहिन्या, रेडिओ, ‘सोशल मीडिया’ व ‘डिजिटल मीडिया’ यांचा समावेश आहे. परंतु नेमकी कुठली माहिती खरी याबाबत काही वेळा संभ्रम निर्माण होतो. हीच बाब लक्षात घेऊन जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ. मोईज हक यांच्या नेतृत्वात ६४ विद्यार्थ्यांनी २८ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत ‘आॅनलाईन’ सर्वेक्षण केले. या कालावधीत सर्वाधिक विश्वासार्ह माहिती मुद्रित माध्यमांनीच दिली व वाचकांनीदेखील वर्तमान पत्रांवरच सर्वात जास्त विश्वास ठेवला, असे या सर्वेक्षणातून समोर आले. सर्वेक्षणात समाजमाध्यमांची विश्वासार्हता, उपयोगिता व जबाबदारीपूर्वक मांडणी या मापदंडांवरदेखील वर्तमानपत्रेच समोर राहिली. सर्वेक्षणात १२०५ नागरिकांनी आपले मत नोंदविले. यात सर्वच स्तरातील नागरिक सहभागी होते.
‘ई-पेपर’वर भर
‘लॉकडाऊन’च्या या कालावधीत वर्तमानपत्रांचे वितरण काही काळासाठी बंद होते. परंतु वृत्तपत्रे निघत होती व वाचकांपर्यंत ‘पीडीएफ कॉपी’ तसेच ‘ई-पेपर’ पोहचविल्या जात होते. २२.८ टक्के नागरिकांनी ई-पेपर’च्या माध्यमातून वर्तमानपत्रे वाचली. तर २७ टक्के नागरिकांनी मित्र, ओळखीचे लोक किंवा पत्रकारांकडून ‘ई-पेपर’चे ‘लिंक’ मिळाले व त्यानंतर वर्तमानपत्रे वाचल्याचे सांगितले. म्हणजेच सुमारे ५० टक्के नागरिकांनी या कालावधीतदेखील वर्तमानपत्रांचाच उपयोग केला.
‘हार्डकॉपी’ नसताना अशी घेतली माहिती
ई-पेपर २२.८ टक्के
वर्तमानपत्रांच्या पीडीएफ, लिंक २७ टक्के
वृत्तवाहिन्या ३६.१ टक्के
‘सोशल मीडिया’ १०.४ टक्के
इतर ३.७ टक्के