वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 01:13 AM2018-05-24T01:13:30+5:302018-05-24T01:13:46+5:30
वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असायला पाहीजे. यामुळे वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि खऱ्या बातम्या पोहोचविणे शक्य असते, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि आरएसएस विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्तमानपत्रांनी सर्वसमावेशक असायला पाहीजे. यामुळे वाचकांपर्यंत निष्पक्ष आणि खऱ्या बातम्या पोहोचविणे शक्य असते, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार आणि आरएसएस विचारवंत मा.गो. वैद्य यांनी व्यक्त केले.
माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता व संचार विद्यापीठ, भोपाळच्यावतीने बुधवारी वैद्य यांना विद्यावाचस्पती (डी.लिट.) पदवी प्रदान करण्यात आली. नुकताच भोपाळ येथे विद्यापीठाचा दीक्षांत समारोह पार पडला. मात्र प्रकृतीच्या कारणामुळे मा.गो. वैद्य समारोहात सहभागी होऊ शकले नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने नागपूरला लक्ष्मीनगर येथील सभागृहात हा पदवीदान समारंभ आयोजित करून त्यांचा गौरव केला. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विद्यापीठाने ही मानद पदवी देऊन त्यांना सन्मानित केले. विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश उपासने समारोहाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते. याप्रसंगी सुनंदा वैद्य, विद्यापीठाचे कुलाधिसचिव लाजपत आहुजा, कुलसचिव संजय द्विवेदी प्रामुख्याने उपस्थित होते.
मा. गो. वैद्य पुढे म्हणाले, वर्तमानपत्रात मुख्य संपादक झाल्यानंतर आपण हा प्रयोग केला होता आणि तो यशस्वीही ठरला. या
प्रयोगानुसार संपादकीय मंडळात विविध राजकीय पक्षांची विचारधारा मानणाऱ्यांना नियुक्त केले होते. त्यांच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले होते. मात्र सर्वांना एक विश्वास दिल्याचे त्यांनी सांगितले. आपणास कधी पत्रकार व्हावे असे वाटत नव्हते. करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. या शिक्षकी पेशात असताना पत्रकार होण्याची संधी प्राप्त झाली. आपण अपघातानेच पत्रकार झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी शिक्षक आणि पत्रकारितेतील अनेक अनुभव उपस्थितांसमोर मांडले.
अध्यक्षीय भाषण करताना विद्यापीठाचे कुलगुरू उपासने म्हणाले, शिक्षक आणि संपादक जेथे असेल तेथे सुधारणा नक्की होतात. लेखक आणि चिंतन करणाऱ्यांच्या लेखनातून सकारात्मक परिणाम समाजात दिसून येतात. मा.गो. वैद्य शिक्षक, लेखक आणि विचारवंत असण्यासह पत्रकारही आहेत. त्यामुळे त्यांच्या लेखनात व्यापकता असल्याचे उपासने म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन संजय द्विवेदी यांनी केले. विद्यापीठाचे सहायक कुलसचिव गिरीश जोशी यांनी आभार मानले.