गुन्हेगारीत नव्हे कारवाईत पुढे

By admin | Published: January 14, 2016 03:37 AM2016-01-14T03:37:17+5:302016-01-14T03:37:17+5:30

गुन्हेगारी वाढवण्यात नव्हे तर गुन्ह्याचा तपास लावून ते उघडकीस आणण्यात नागपूर शहर अग्रेसर आहे.

Next in criminal action | गुन्हेगारीत नव्हे कारवाईत पुढे

गुन्हेगारीत नव्हे कारवाईत पुढे

Next

गेल्या वर्षीपेक्षा यंदा गुन्हेगारीत घट : नागपूर शहर पोलिसांचा दावा
नागपूर : गुन्हेगारी वाढवण्यात नव्हे तर गुन्ह्याचा तपास लावून ते उघडकीस आणण्यात नागपूर शहर अग्रेसर आहे. गेल्या वर्षीची तुलना केली असता शहरातील गुन्हेगारीत कमालीची घट झाली आहे, असा दावा पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांनी केला आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी बुधवारी पोलीस जिमखाना येथे आयोजित पत्रपरिषद घेऊन शहरातील गुन्हेगारी गेल्या वर्षीच्या तुलनेत कशी कमी झाली आहे, याची आकडेवारीच सादर केली.
महाराष्ट्रात नागपूर हे गुन्हेगारीमध्ये पहिल्या तीनमध्ये कुठेच नाही, असा दावाही यावेळी पोलिसांनी केला. नागपूर शहरात गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आकडेवारी सादर करतांना सांगण्यात आले की, खुनाच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत २३ टक्के कमतरता आली आहे. खुनाचा प्रयत्न केल्याचे प्रमाण १० टक्क्यांनी घटले आहे. घरफोडी, २७ टक्के, चेनस्नॅचिंग, दरोडा ८ टक्के घट झाली आहे. एप्रिल आणि आॅगस्ट या महिन्यात प्रत्येकी एक गोळीबाराची घटना सोडल्यास गँगवार जवळपास बंद झाले आहे. शासकीय नोकरांवरील हल्ले, दंगा, जबरी चोरी आदींच्या गुन्ह्यातसुद्धा कमतरता आली आहे. ड्रंकन ड्राईव्ह आणि वाहतूक शाखेतर्फे यंदा मागील दहा वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कारवाई करण्यात आली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरोड्यातील १०० टक्के प्रकरणे उघडकीस आणण्यास यश आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शहरातील गुन्हेगारी संदर्भातील प्रेझेंटेशन सादर केले.
पत्रपरिषदेला पोलीस उपायुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त संजय लाटकर, पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार, पोलीस उपायुक्त इशू सिंधू, पोलीस उपायुक्त दीपाली मासिरकर , पोलीस उपायुक्त संजय लाटकर आदी उपस्थित होते.

राज्यात सर्वाधिक एमपीडीए कारवाई
नागपूर पोलिसांनी वर्षभरात ३८ जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. ही राज्यात सर्वाधिक असून इतिहासात इतक्या जणांवर वर्षभरात एमपीडीए कारवाई कधीच झालेली नाही. यासोबतच १२ जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली.

चांगल्या कामगिरीसाठी नागपूर तिसऱ्या स्थानावर
चांगली कामगिरी करण्यात नागपूर शहर हे राज्यात तिसऱ्या क्रमांकवर आहे. आॅपरेशन मुस्कानमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय शाळांमध्ये जाऊन मुलींना जागृत करण्यासाठी राबविण्याचे येणारे आॅपरेशन रक्षक, महिला गस्त पथक, आय वॉच पोलीस, सामाजिक सुरक्षा समिती आदी सुद्धा राबविले जात आहे.

पोलीस उपायुक्त देणार प्रत्येक ठाण्याला भेट
सामान्य नागरिकांना पोलीस ठाण्यात चांगली वागणूक मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. काही पोलिसांची तशी मानसिकता आहे. ती सुधारण्याच्या दृष्टीने आणि पोलीस ठाण्याला एकूणच गती देण्यासाठी पोलीस उपायुक्त हे प्रत्येक आठवड्यात एका पोलीस ठाण्याला भेट देतील. यावेळी ते नागरिकांशीही संवाद साधतील. याशिवाय आकस्मिक भेटीसुद्धा दिल्या जातील.

एक पोलीस एक गुन्हेगार
दत्तक योजनेंतर्गत एक पोलीस एक गुन्हेगार ही योजना राबविली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक गुन्हेगाराला दर महिन्याला पोलीस ठाण्यात बोलाविले जाईल. त्याचा आढावा घेतला जाईल.

महिलांवरील गुन्हे ९० टक्के ओळखीच्याच व्यक्तींकडून
महिलांवरील गुन्हे वाढले आहेत. परंतु अन्याय आणि बलात्कार यासारखे गुन्हे हे ९० टक्के ओळखीच्याच व्यक्तींकडून झाल्याचे निदर्शनास आले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Next in criminal action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.