‘डिजीटल’ विद्यापीठासाठी पुढचे पाऊल, विद्यार्थ्यांना भरता येणार ‘आॅनलाईन’ शुल्क
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2017 10:18 PM2017-07-31T22:18:19+5:302017-07-31T22:18:19+5:30
नागपूर, दि. ३१ -निकालांमध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांना मागे टाकणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘डिजीटलायझेशन’कडे आणखी एक पाऊल टाकले आहे. विद्यार्थ्यांना आता घरबसल्या विविध प्रकारची शुल्क ‘आॅनलाईन’ माध्यमातून भरता येणार आहे. तसेच १९५० पासूनची निकालपत्रेदेखील ‘ई’ स्वरुपात संरक्षित करण्यात येणार आहे. ‘ई’ शुल्काचा मुद्दा ‘लोकमत’ने सातत्याने लावून धरला होता हे विशेष.
नागपूर विद्यापीठात ‘ई-रिफॉर्म्स’चे विविध प्रयत्न सुरू आहेत. नागपूर विद्यापीठात विविध प्रमाणपत्रे, कागदपत्रे तसेच संशोधनासंदर्भातील विविध शुल्क भरण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांची गर्दी दिसून येते. परीक्षा भवन तसेच ‘कॅम्पस’मध्ये शुल्क भरण्यासाठी केंद्र उघडण्यात आली आहेत. परंतु या केंद्रांवर अनेकदा गर्दीच असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना रांगेमध्ये ताटकळत उभे रहावे लागते. शिवाय ऊन, पावसात त्यांची उगाच पायपीटदेखील होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा तर केवळ शुल्क भरण्यासाठी एक दिवस वाया जातो.
हीच बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या वित्त विभागात ‘आॅनलाईन’ शुल्क भरण्याची सुविधा व्हावी अशी मागणी समोर येऊ लागली होती. याअंतर्गत अखेर वित्त विभागाच्या ‘ईआरपी’ला (एन्टरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) एका खासगी बँकेच्या ‘गेटवे‘सोबत जोडण्यात आले आहे. याअंतर्गत सुमारे १० ते १२ प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांना ‘आॅनलाईन’ भरता येणार आहेत. मात्र विद्यार्थ्यांना शुल्क भरल्याच्या पावतीचे ‘प्रिंट आऊट’ व आवश्यक कागदपत्रे विद्यापीठात सादर करावी लागतील. मंगळवारपासून ही प्रणाली सुरू होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.
संकेतस्थळावर उपलब्ध
प्रामुख्याने द्वितीय गुणपत्रिका, प्रवजन प्रमाणपत्र, गुणपत्रिका किंवा पदवी पडताळणी, पात्रता प्रमाणपत्र इत्यादीसाठीचे शुल्क ‘आॅ़नलाईन’ माध्यमातून भरता येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ‘रिझल्ट’च्या ‘लिंक’मध्ये गेल्यावर ‘फॉर्म्स सेंट्रल’वर ‘क्लिक’ केल्यावर नोंदणी करता येईल. आवश्यक माहिती भरल्यानंतर ‘पेमेन्ट गेटवे’ उघडेल.
३ टप्प्यांत कागदपत्रांचे ‘डिजीटलायझेशन’
राज्य शासनाच्या अग्रवाल समितीने ‘ई-रिफॉर्म्स’संदर्भात अनेक सूचना केल्या होत्या. त्यात कागदपत्रांचे ‘डिजीटलायझेशन’ हादेखील मुद्दा होता. याबाबतीत नागपूर विद्यापीठाने पाऊल उचलले असून निकालपत्र आणि गुणांचा तपशील ‘ई’ स्वरुपात संरक्षित करण्यात येणार आहे. १९५० पासूनच्या कागदपत्रांचा यात समावेश असून ३ टप्प्यांत हे काम चालेल. अगोदर २००१ ते २०१६, त्यानंतर १९७६ ते २००० व अखेरच्या टप्प्यात १९५० ते १९७५ या कालावधीतील निकालपत्रांना ‘डिजीटल’ स्वरुप देण्यात येईल. यासंदर्भात लवकरच निवीदा प्रक्रिया राबविण्यात येईल, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.