कोरोनासाठी पुढील दोन महिने महत्त्वाचे! प्रवासामधून पसरण्याचा धोका अधिक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 09:16 PM2021-11-22T21:16:55+5:302021-11-22T21:32:07+5:30
Nagpur News दिवाळी होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना स्थितीचा अंदाज येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नागपूर : दिवाळीच्या काळात बाजारात झालेली गर्दी, प्रवाशांमध्ये झालेली वाढ व कोरोना नियंमाचा पडलेला विसर, यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र, दिवाळी होऊन आता दोन आठवड्यांचा कालावधी झाल्यानंतरही रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. असे असले तरी पुढील दोन ते तीन महिन्यांत कोरोना स्थितीचा अंदाज येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सव पाठोपाठ दिवाळी सण साजरा झाल्यानंतरही नागपुरात मागील तीन महिन्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ दिसून आलेली नाही. मात्र, पुढे ख्रिसमस व नववर्षाचा जल्लोष असल्याने पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यातच फेब्रुवारी, मार्च महिन्यात तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे गाफील राहिल्यास संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-हायरिस्कसाठी बुस्टर डोसचा विचार व्हावा - डॉ. जय देशमुख
प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख म्हणाले, कोरोना संपला असल्याचे मानले जात असतानाच युरोपात अचानक रुग्णसंख्या वाढली. ऑस्ट्रलीयावर पुन्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची वेळ आली. जर्मनीतील परिस्थिती विकोपाला गेली. तिथेही लॉकडाऊन लावण्याचा विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण कोरोनाचे नियम न पाळणे हे धोकादायक ठरणार आहे. आपल्यासाठी डिसेंबर व जानेवारी हे दोन महिने महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेष म्हणजे, जे हायरिस्क आहेत त्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा बुस्टर डोसचा विचार करायला हवा. सरकारनेही याला गंभीरतेने घेऊन यावर निर्णय घ्यायला हवा.
-रुग्णसंख्या वाढेल, परंतु भयावह स्थिती राहणार नाही - डॉ. अशोक अरबट
प्रसिद्ध श्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, क्रिम्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे दोन रुग्ण भरती आहेत. हे रुग्ण गुजरातमधील एका लग्न समारंभात गेले होते. तिथे त्यांच्या कुटुंबातील ७ ते ८ जण बाधित आले. यावरून कोरोनाचा प्रवास संपलेला नाही. सध्या आपल्याकडे विविध कारणांनी प्रवाशांची संख्या वाढली आहे. यामुळे भविष्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता अधिक आहे. परंतु दुसऱ्या लाटेसारखी भयावह स्थिती राहणार नाही. सौम्य लक्षणे असलेले रुग्णच अधिक दिसून येतील. जे मध्यम लक्षणांपासून गंभीर लक्षणांकडे जातील, तेच रुग्णालयात भरती होऊन उपचार घेतील. विशेषत: कोरोनाचा २० ते २५ टक्केच रुग्ण उपचाराखाली राहतील. यामुळे काळजी घेण्याची गरज आहे.
-कोरोनोचा नवा व्हेरियंट आलाच तरच धोका -डॉ. प्रशांत जोशी
कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. प्रशांत जोशी म्हणाले, दिवाळीनंतरही कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे. परंतु युरोपमध्ये लसीकरण होऊनही तिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आपल्याकडे लसीकरणाला सुरुवात होऊन जवळपास १० महिन्यांचा कालावधी झाला आहे. यामुळे दोन्ही डोस घेऊनही रोगप्रतिकार शक्ती कमी होण्याची शक्यता अधिक आहे. यातच नवीन व्हेरियंट आलाच तरच धोका होण्याची भीती आहे. यामुळे प्रत्येकाने कोरोनाचे नियम पाळणे आवश्यक आहे.
::विदर्भात मागील तीस दिवसांची स्थिती
२१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर : २१० रुग्ण
५ ते १९ नोव्हेंबर :२०० रुग्ण