गडकरींना धमकावणाऱ्या जयेशची ‘एनआयए’कडून चौकशी; आणखी धक्कादायक बाबी समोर येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2023 08:49 PM2023-05-08T20:49:33+5:302023-05-08T20:50:24+5:30
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीसाठी फोन करून धमकावणारा तसेच ‘टेरर लिंक’ असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीरची ‘एनआयए’च्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी) पथकाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात खंडणीसाठी फोन करून धमकावणारा तसेच ‘टेरर लिंक’ असलेल्या जयेश पुजारी ऊर्फ शाकीरची ‘एनआयए’च्या (नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी) पथकाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. ‘एनआयए’च्या पथकाने सोमवारी नागपुरात येऊन जयेशची चौकशी सुरू केली. या चौकशीतून त्याच्याशी संबंधित इतर दहशतवादी कारवायांची माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नितीन गडकरींना बेळगाव कारागृहातून धमकीचे फोन केल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस जयेशला नागपुरात आणण्यात आले व चौकशीतून धक्कादायक खुलासे होण्यास सुरुवात झाली. त्याची लष्कर-ए-तोएबा, पीएफए या संघटनांच्या सदस्यांशी ‘लिंक’ समोर आली. त्यानंतर त्याच्यावर ‘यूएपीए’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांना जीवे मारण्याची सुपारी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. लष्कर-ए-तोयबा आणि पीएफआय या दहशतवादी संघटनांनी त्याला ईश्वरप्पांची सुपारी दिली होती. मात्र, त्याअगोदरच तो या प्रकरणात अडकला. जयेशने त्याच्या एका साथीदाराला कारागृहातून बाहेर काढून शस्त्रांसाठी पैसेही उपलब्ध करून दिले होते. या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद दिल्लीतदेखील उमटले व ‘एनआयए’ने याची चौकशी करावी, असा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला. गृहमंत्रालयाने ‘एनआयए’ चौकशीला हिरवी झेंडी दाखविली व रविवारी रात्री ‘एनआयए’चे पथक नागपुरात दाखल झाले. सोमवारी ‘एनआयए’च्या पथकाने जयेशची कसून चौकशी केली. तसेच या प्रकरणातील नागपूर पोलिस दलातील तपास अधिकाऱ्यांकडूनदेखील प्रकरणाची सद्य:स्थिती जाणून घेतली. नागपूर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील तपास पथकाने भेट घेतली.
बंगळुरूत गुन्हा दाखल
या प्रकरणात ‘एनआयए’ने वेगाने सूत्रे हलविली आहेत. एक पथक नागपुरात येऊन चौकशी करीत असताना बंगळुरूत जयेशविरोधात ‘एनआयए’ने गुन्हा दाखल केला आहे. लवकरच त्याची ‘कस्टडी’ घेतली जाण्याची शक्यता आहे. चौकशीसाठी त्याला इतरत्र हलविण्यात येण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कागदपत्रेदेखील घेतली ताब्यात
‘एनआयए’च्या पथकाने या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांकडून विस्तृत माहिती घेतली व संबंधित कागदपत्रेदेखील ताब्यात घेतली. जयेश सध्या मध्यवर्ती कारागृहात असून, त्याची बराच वेळ चौकशी करण्यात आली.