एमडी तस्करी करणाऱ्या नायजेरियन नागरिकास अटक ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:07 AM2021-07-15T04:07:03+5:302021-07-15T04:07:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मुंबईसह देशभरात एमडीचा पुरवठा करणारा एक नायजेरियन नागरिक बुधवारी गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलच्या हाती ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईसह देशभरात एमडीचा पुरवठा करणारा एक नायजेरियन नागरिक बुधवारी गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलच्या हाती लागला. अँथोनी आयवोक ऊर्फ आयके असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात आले असून, १७ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
अँथोनी मुंबईतील नालासोपारा येथे राहतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन नागरिक राहतात. यापैकी अनेक जण मादक पदार्थाची तस्करी आणि फसवणुकीच्या धंद्यात सहभागी आहेत. एनडीपीएस सेलने ५ जुलै रोजी ऑटो डील व्यावसायिक अंकित राजकुमार गुप्ता (२८), त्याचा भाऊ ऋतिक गुप्ता (२०) रा. सुभाष पुतळा लकडगंज आणि ऋषभ सोनकुसरे (३०) रा. तीन नल चौक यांना अटक करून ८.२८ लाख रुपयाची एमडी तसेच ३.२५ लाख रुपये किमतीची कार जप्त केली हाेती. तिघेही मुंबईवरून एमडी घेऊन नागपूरला पोहोचले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना पकडले. त्यांनी मुंबईतील कुख्यात मेहंदी हाशमी ऊर्फ मामू याच्याकडून एमडी खरेदी केल्याचे सांगितले होते. या आधारावर ७ जुलै रोजी मामूला अटक करण्यात आली. पोलिसांनी मामूच्या व्हॉट्सॲप चॅटची तपासणी केली, तेव्हा तो अँथोनीच्या संपर्कात असल्याचे लक्षात आले. अँथोनीसोबत असलेले त्याचे फोटोही पोलिसांच्या हाती लागले. विचारपूस केली असता, मामू अँथोनीबद्दल काहीही सांगत नव्हता. अखेर पोलिसांनी तपासाची दिशा बदलविली. त्याचा फायदा झाला. अँथोनीचा पत्ता मिळाला. तो मीरा भाईंदर परिसरात असल्याची माहिती मिळाली. तेथील गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या मदतीने त्याला पकडून नागपूरला आणण्यात आले. बुधवारी अँथोनीसह मामू व इतर आरोपींना न्यायालयासमोर सादर करून १७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले. अँथोनीकडून मादक पदार्थाचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. अँथोनीला २०१९ मध्ये मीरा भाईंदर पोलिसांनी पासपोर्ट नियमांचे उल्लंघन करीत येथे राहत असल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्याला अटकही झाली होती. २०२० मध्ये तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतरही तो येथेच राहत आहे. ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात पीआय विशाल काळे, एपीआय सूरज सुरोसे, हवालदार प्रदीप पवार, राजेश देशमुख आणि नितीन मिश्रा यांनी केली.
बॉक्स
मामू अनेक शहरात सक्रिय
मामू हा नागपूरशिवाय मुंबई, सूरत, अहमदाबाद आदी शहरांमध्येही सक्रिय आहे. तो एमडी आणि कोकिनची तस्करी करतो. नागपुरात तो अनेक वर्षांपासून सक्रिय होता. गुप्ता बंधूंशिवाय इतर अनेकांना तो पुरवठा करीत असल्याची माहिती आहे.