नागपुरात रात्री संचारबंदी , दिवसा जमावबंदी : मनपा आयुक्तांचे आदेश जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 09:14 PM2021-04-05T21:14:49+5:302021-04-05T21:22:36+5:30
Night curfew in Nagpur कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावले आहे. नागपूर शहरातही हे निर्बंध लागू राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावले आहे. नागपूर शहरातही हे निर्बंध लागू राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहतील. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी याबाबत आदेश जारी केले. त्यानुसार सोमवारी रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. रात्री ८ नंतर संचारबंदी तर दिवसाला जमावबंदी राहील.
अत्यावश्यक सेवा, औषधी दुकाने, किराणा , फळे, भाजीपाला वगळता शहरातील सर्व दुकाने व मार्केट ३० एप्रिल पर्यंत बंद राहणार आहे. सार्वजनिक व खासगी वाहतूक ५० टक्के क्षमतेने सुरू राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गदीर्ची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन राहणार आहे.मात्र आदेशात स्पष्टता नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
हे राहणार सुरू
- किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक दुकाने
-अत्यावश्यक सेवा
- शासकीय कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार.
- बस वाहतूक (५० टक्के क्षमतेने)
-रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी
- टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी ५० टक्के प्रवासी
-वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु
-ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८
हे राहणार बंद
मॉल आणि दुकाने
- बार,उपाहारगृहे, हॉटेल (पार्सल सेवा सुरू राहील)
- उद्याने, जीम ,जलतरण तलाव, क्रीडा संकुल.
- खासगी कार्यालयांसाठी वर्क फ्रॉम होम बंधनकारक.
- सिनेमागृह, नाट्यगृह,क्लब्स
- ब्युटी पार्लर, केशकर्तनालये
- सर्व धार्मिक स्थळे
-शाळा- महाविद्यालये (परीक्षा वगळता)खासगी क्लासेस
१४४ कलम जारी
राज्याप्रमाणे नागपुरातही १४४ कलम लागू राहील. सकाळी ७ ते रात्री ८ जमावबंदी म्हणजे ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील. तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही. यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या आहेत.