राज्यभरात भरली हुडहुडी! नागपुरात रात्रीचा पारा ८.७ अंशावर; विदर्भातील सर्व जिल्ह्यात पारा घसरला
By निशांत वानखेडे | Published: January 25, 2024 07:42 PM2024-01-25T19:42:07+5:302024-01-25T19:43:11+5:30
आकाशातून ढगांची गर्दी पूर्णपणे हटल्यानंतर दिवसरात्रीच्या तापमानात मोठी घसरण झाली.
नागपूर: आकाशातून ढगांची गर्दी पूर्णपणे हटल्यानंतर दिवसरात्रीच्या तापमानात मोठी घसरण झाली असून कोकण वगळता राज्यभरातील बहुतेक जिल्ह्यात गारठा वाढला आहे. पुणे व नाशकात सर्वात कमी ८.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली तर नागपूरचाही पारा २४ तासात ५.९ अंशाने घसरत ८.७ अंशावर पडला. त्यामुळे चांगलीच हुडहुडी भरली आहे.
दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि हिंदी महासागरात तयार झालेले सायक्लोनिक सर्क्युलेशन व दक्षिण कर्नाटकातून विदर्भाच्या दिशेने सरकलेल्या झंझावातामुळे तयार झालेले नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण आता पूर्णपणे निवळले असून आकाश निरभ्र झाले. दुसरीकडे हवेच्या अनुकूल दिशेमुळे उत्तर भारताकडील जबरदस्त थंडीचा प्रभाव विदर्भासह महाराष्ट्रावर वाढला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात दिवसरात्रीचा पारा सरासरीच्या खाली आला. मध्य महाराष्ट्रात मंगळवारपासूनच गारठा वाढला होता.
विदर्भात बुधवारी म्हणजे २४ जानेवारीला वातावरण बदलायला सुरुवात झाली. गुरुवारी काही जिल्ह्यातील पारा १० अंशाच्या खाली घसरला. विदर्भात ८.७ अंश तापमानासह नागपूर सर्वाधिक गारठले. याशिवाय यवतमाळ ९ अंश, गोंदिया व अकोला ९.५ अंश, चंद्रपूर ११ अंश किमान तापमानाची नोंद झाली असून २४ तासात पारा ४ ते ५ अंशाने खाली घसरला आहे. राज्यातील जळगाव ९.३, छ. संभाजीनगर ९.४ अंश, परभणी १०.९ तर उद्गीर १०.७ अंशावर आहेत.
या जिल्ह्यात दिवसाचे तापमानसुद्धा सरासरीच्या खाली आले आहे. नागपुरात २६.४ अंश कमाल तापमान असून सरासरीच्या २.९ अंश तर गोंदियात २५.५ अंश असून सरासरीच्या ३.५ अंशाने खाली घसरले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढचा आठवडाभर नागपूरसह विदर्भ व महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणातील हुडहुडी जाणवणार आहे.
नागपुरात १० वर्षाची सरासरी कायम
नागपूरला गेल्या १० वर्षात जानेवारी महिन्यात किमान तापमान ८ अंशाच्या खाली गेले आहे. केवळ २०२१ मध्ये १०.३ अंशाची नोंद झाली होती. गेल्या वर्षी व २०१८ मध्ये तापमान किमान तापमान ८ अंशावर गेले. २०१५ मध्ये ५.३ अंश, २०१६ साली ५.१ अंश, २०१९ ला ३० जानेवारी रोजी ४.६ अंश तर २०२० मध्ये ५.८ अंशावर रात्रीचा पारा गेला होता.