‘पेंच’मध्ये नाईट पेट्रोलिंग सफारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:06 AM2017-10-03T01:06:01+5:302017-10-03T01:06:22+5:30
समृध्द निसर्ग व वनसंपदेच्या अनुभवासोबत जंगलातील मुक्त संचार असलेल्या ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समृध्द निसर्ग व वनसंपदेच्या अनुभवासोबत जंगलातील मुक्त संचार असलेल्या विविध वन्य प्राणी, पक्षी तसेच जैवविविधतेने समृध्द वनसंपदेची पाहणी करण्यासाठी वनविभागातर्फे सफरीची व्यवस्था करण्यात येते. यासोबतच रात्रीचेही जंगल जवळून अनुभवता यावे यासाठी पेंच टायगर प्रकल्पांतर्गत असलेल्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्राच्या बफरझोनमध्ये राज्यातील पहिल्या नाईट पेट्रोलिंग सफारीची सुविधा उपलब्ध झाली आहे.
नागपूरपासून केवळ ६० किलोमीटवर असलेल्या पेंच टायगर प्रकल्पाच्या सुरेवाणी (नागलवाडी) वनपरिक्षेत्रात नाईट पेट्रोलिंगची सुविधा उपलब्ध असून येत्या १५ आॅक्टोबरपासून पर्यटकांना नाईट पेट्रोलिंगच्या सफारीमध्ये सहभाग घेणे शक्य होणार आहे. सुरेवाणी परिसरातील १३८ चौरस किलोमीटर क्षेत्रापैकी ४० किलोमीटर परिसरात नाईट सफारीची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. सायंकाळी ७.३० वाजेपासून तर रात्री १२ वाजेपर्यंत नाईट पेट्रोलिंग सफारीमध्ये जवळून जंगल अनुभवता येणार आहे.
नाईट पेट्रोलिंग सफारीसाठी दरदिवशी केवळ तीन जिप्सी अथवा एसयुव्ही वाहनांनाच परवानगी राहणार आहे. या सफारीसाठी मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र पकल्प, झिरो माईल जवळील कार्यालयात बुकिंगची व्यवस्था उपलब्ध आहे. तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय नागलवाडी येथे सुध्दा सफारीचे बुकिंग करण्याची सुविधा आहे. या सफारीमध्ये वन्यजीव क्षेत्रात कार्य करणाºया तसेच निसर्गप्रेमींना प्राधान्य राहणार आहे. एका वाहनामध्ये चार पर्यटक तसेच वाहन चालक व गाईड आणि फॉरेस्ट गार्ड सोबत असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
रात्रीच्या पेट्रोलिंग सफारीचा आनंद घेता यावा यासाठी वनविभागातर्फे याच परिसरात निसर्ग मार्गदर्शन केंद्रामार्फत राहण्याची सुध्दा व्यवस्था केली आहे. यासाठी पाच इको होम, दोन डारमेट्री तसेच भोजनगृह, कॉन्फरन्स हॉल आदी सुविधा सुध्दा सुरेवाणी येथे उपलब्ध आहे. नागपूर जिल्ह्याच्या निसर्ग व वन पर्यटनाच्या क्षेत्रातील हा उपक्रम राज्यात तसेच देशातील पर्यटकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
मचाण पर्यटन
मचाण पर्यटनांच्या माध्यमातून सूर्यास्तापासून तर सूर्यादयापर्यंत मचानवर बसून निसर्ग व वन्य प्राण्यांना बघण्याची संधी पर्यटकांना उपलब्ध झाली आहे. सुरेवाणी येथील वनक्षेत्रात यासाठी पाच मचान सज्ज करण्यात आले असून १५ फेब्रुवारी ते १५ जूनपर्यंत पर्यटकांना उपलब्ध होत आहे. फूट पेट्रोलिंग (पायदळ गस्त) ही सुविधा सुध्दा वन विभागातर्फे सुरू करण्यात आली आहे.