थर्टी फस्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 10:38 PM2017-12-29T22:38:28+5:302017-12-29T22:44:12+5:30
सरत्या वर्षाला 'गुड बाय' करण्यासाठी आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात विजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना विजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : सरत्या वर्षाला 'गुड बाय' करण्यासाठी आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाले आहेत. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमात विजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना विजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
नागपूर शहर आणि लगतच्या परिसरात अनेक लॉन, हॉटेल्स, रिसॉर्टस आणि ढाब्यांवर मनोरंजनासोबतच गायन, नृत्य, डीजे, बॉलिवूड नाईट, डिस्को, जॉझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स, पार्टीज, लाईव्ह बॅण्ड यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. अशा कार्यक्रमांप्रसंगी अनेक ठिकाणी चोरीची वीज वापरली जात असल्याची माहिती असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अशा कार्यक्रमाप्रसंगी वीजचोरी आढळल्यास वीजचोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित आयोजकाचा परवाना रद्द्बातल करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावाही केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराबाहेरील अनेक ढाबाचालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महामार्ग व रस्त्यांवर चोरीच्या विजेवर आकर्षक रोषणाई करीत असल्याचीही माहिती असून मंडप डेकोरेशन व्यावसायिकांकडून वीज तारांवर आकडे टाकून देण्याची व्यवस्था केली जात असल्याचीही माहिती आहे. अशा ढाबा आणि मंडप डेकोरेशन व्यावसायिकांवर कठोर कारवाईसोबतच त्यांचाही व्यावसायिक परवाना रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याबाबत महावितरणची आग्रही भूमिका राहील.
३१ डिसेंबर हा उत्सवाचा सण असून या दिवशी उत्सवप्रेमींच्या आनंदात विघ्न पडू नये यासाठी अधिकृत विजेचाच वापर करण्यात येऊन आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.