निकिता बनली महिला ‘विदर्भ केसरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 10:20 PM2019-08-05T22:20:53+5:302019-08-05T22:22:36+5:30

चार वर्षांआधी ती कुस्ती खेळाकडे वळली. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर मैदान गाजविल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी ‘विदर्भ केसरी’हा बहुमान पटकविला. ऑटोचालक असलेल्या वडिलांच्या आग्रहामुळे या खेळात करियर करणाऱ्या निकिता भरत लांजेवार या महिला मल्लाची यशस्वी झेप देदिप्यमान अशीच आहे. परतवाडा येथे रविवारी संपलेल्या विदर्भ केसरी स्पर्धेत निकिताने हा मानाचा किताब जिंकला.

Nikita becomes a woman 'Vidarbha Kesari' | निकिता बनली महिला ‘विदर्भ केसरी’

निकिता बनली महिला ‘विदर्भ केसरी’

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या २१ वर्षांच्या कुस्तीपटूची चार वर्षांत यशस्वी झेप

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: चार वर्षांआधी ती कुस्ती खेळाकडे वळली. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर मैदान गाजविल्यानंतर वयाच्या २१ व्या वर्षी ‘विदर्भ केसरी’हा बहुमान पटकविला. ऑटोचालक असलेल्या वडिलांच्या आग्रहामुळे या खेळात करियर करणाऱ्या निकिता भरत लांजेवार या महिला मल्लाची यशस्वी झेप देदिप्यमान अशीच आहे. परतवाडा येथे रविवारी संपलेल्या विदर्भ केसरी स्पर्धेत निकिताने हा मानाचा किताब जिंकला.
अंतिम लढतीत अमरावतीच्या खुशबू चौधरीविरुद्ध निकिताने सुरुवातीपासून पकड राखत ६-२ अशी आघाडी संपादन केली होती. प्रतिस्पर्धी खुशबूला अवघ्या तीन मिनिटांत चितपट करीत निकिताने चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. त्याआधी उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीतही निकिताने क्रमश: वर्षा आणि चंद्रपूरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर चितपटद्वारे मात केली हे विशेष. निकिताला जेतेपदाबद्दल सुवर्ण पदक तसेच पाच हजार रुपये रोख पुरस्कार मिळाला.
निकिता मागच्यावर्षी वणी येथे झालेल्या विदर्भ केसरीत ६३ किलो गटात सुवर्ण पदक विजेती बनली होती. निकिताच्या कुस्तीचा प्रवास लकडगंज येथील अन्नपूर्णा हायस्कूलपासून सुरू झाला. शालेय स्तरावर सलग चारवेळा सुवर्ण जिंकल्यानंतर कोल्हापूर येथील राज्य शालेय स्पर्धेत तिने सुवर्ण जिंकले होते. त्याचवर्षी राष्ट्रीय स्पर्धेत मात्र तिला पदक जिंकण्यात अपयश आले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही निकिताने स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटवीत रौप्य (नागपूर) आणि कांस्य पदक(आळंदी) जिंकले आहे.
भवानी मंदिर पारडी येथे राहणारी ही खेळाडू सध्या व्हीएमव्ही महाविद्यालयात बीएच्या दुसºया वर्षाला आहे . मागच्यावर्षी औरंगाबाद येथे झालेल्या अ.भा. आंतर विद्यापीठ स्पर्धेत निकिता ६२ किलो वजन गटात उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली होती. दयाराम भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात निकिता यशवंत स्टेडियममधील नागपूर अकादमीतील मॅटवर नियमित सराव करते. परतवाडा येथे निकिताच्या सोबतीने अनुष्का ठाकरे(४० किलो गटात सुवर्ण),अंशिता मनोहरे(४८ किलो रौप्य)आणि रुचिका ठाकरे (४४ किलो कांस्य) यांनी पदके जिंकताच नागपूर हा संघ १३५ गुणांसह सांघिक गटात विजेता ठरला.
 मुलींची रुची वाढली
कुस्तीत अलिकडे मुलींची रुची वाढल्याचे सांगून त्यामागे घरच्यांचे प्रोत्साहन असल्याचे निकिताने सांगितले. परतवाडा येथे ३०० महिला मल्लांचा विविध वजन गटात सहभाग असल्यामुळे दोन दिवस न थांबता कुस्त्या पार पाडाव्या लागल्या. कुस्तीला मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळेच मुलींची प्रशंसनीय प्रगती होत असल्याचे मत निकिताने व्यक्त केले.

Web Title: Nikita becomes a woman 'Vidarbha Kesari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.