निकिता चौधरी जळीतकांडातील आरोपीविरुद्ध अखेर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 11:37 AM2022-03-25T11:37:11+5:302022-03-25T11:49:39+5:30
पोलिसांनी निकिताचा मित्र राहुल बांगरे याच्याविरुद्ध निकिताला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उलटसुलट चर्चेचे सर्वत्र रान पेटवणाऱ्या निकिता लखन चौधरी (वय २३) या तरुणीच्या संशयास्पद जळीतकांडात अखेर बुधवारी वाडी पोलिसांनी तिच्या मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. राहुल मनोहर बांगरे (वय २३) असे आरोपीचे नाव आहे.
१५ मार्चला सायंकाळी निकिता बेपत्ता झाली. दुसऱ्या दिवशी सायंकाळी तिचा अर्धवट जळालेला मृतदेह वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळून आला. एकूणच परिस्थिती संशयास्पद असल्याने निकितावर अत्याचार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. निकिताच्या पालकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनवजा तक्रारीतून तसा आरोपही केला होता. दरम्यान, वाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. वैद्यकीय अहवालातून निकिताचा मृत्यू जळाल्यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते. मात्र, बलात्कार झाला किंवा नाही ते प्राथमिक अहवालात स्पष्ट केले नव्हते. इकडे कॅण्डल मार्चने पोलिसांचा बीपी वाढवला होता.
त्यामुळे पोलीस दुसऱ्या ॲगलने तपास करीत होते. त्यांनी त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. त्यात निकिता ऑटोतून सुराबर्डी- वाडीकडे गेल्यानंतर एकटीच घटनास्थळाकडे जाताना दिसत होती. तत्पूर्वी तिने एका मित्राकडून बाटलीत डिझेल मागवून घेतले होते. एक दिवसापूर्वी निकिताने तिच्या मैत्रिणींसोबत चॅटिंग करताना आपली व्यथा मेसेजच्या रूपाने पाठवली होती. त्यात तिने राहुल (मित्र) खूप टॉर्चर करतो. संशय घेऊन छळतो. घाणेरड्या शिव्या देतो, अपमान करतो, मारहाण करतो, असे म्हटले होते. यातून निकिताला प्रचंड मानसिक त्रास होत असल्याचे दिसून येत होते. हे सर्व पुरावे पोलिसांनी गोळा केले.
...अखेर वैद्यकीय अहवाल आला
अखेर, पोलिसांना मंगळवारी फायनल वैद्यकीय अहवाल मिळाला. निकितावर अत्याचार झाला नाही किंवा तिच्या शरीरावर मारहाणीच्याही कोणत्या खुणा नसल्याचे डॉक्टरांनी या अहवालात स्पष्ट केले. निकिताच्या मृत्यूनंतर प्राण्यांनी मृतदेह तोडण्याचा प्रयत्न केला, असाही अंदाज अहवालात नमूद करण्यात आला. त्यामुळे बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात कोणत्या स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा, त्यासंबंधाने प्रदीर्घ चर्चा केली.
संबंधितांचा जबाब अन् तांत्रिक पुरावे आधार
परिस्थितीजन्य पुरावे, डॉक्टरांचा अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइलचे कॉल डिटेल्स, चॅटिंग आणि निकिताच्या मित्र-मैत्रिणींसह कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी निकिताचा मित्र राहुल बांगरे याच्याविरुद्ध निकिताला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा (कलम ३०६ भादंवि) दाखल केला.