निकिताची मृत्यूशी झुंज
By admin | Published: October 4, 2015 03:09 AM2015-10-04T03:09:00+5:302015-10-04T03:09:00+5:30
फुटाळा चौपाटीवर एका हॉटेलच्या बाजूला संशयास्पदरीत्या जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या निकिता विष्णूदास फुलवानी ...
नागपूर : फुटाळा चौपाटीवर एका हॉटेलच्या बाजूला संशयास्पदरीत्या जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या निकिता विष्णूदास फुलवानी (वय २२) हिची प्रकृती चिंताजनक असून, तिला मेडिकलमधून मध्यरात्री देवनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे तिच्यावर अतिदक्षता विभागात डॉक्टरांची चमू उपचार करीत असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, या जळीत प्रकरणाने उलटसुलट चर्चेला उधाण आले असताना या घटनेच्या दोन तासानंतर फुटाळा तलावात एका तरुणाने उडी मारून आत्महत्या केल्यामुळे संशयकल्लोळ अधिकच वाढला आहे. दुसरीकडे घटनेच्या वेळी या परिसरात कर्तव्यावर असलेले पोलीस कुठे होेते, असा प्रश्नही आता उपस्थित केला जात आहे.
शहरातील पर्यटनस्थळ असलेल्या फुटाळा तलावावर भल्या सकाळपासूनच गर्दी असते. मात्र, रात्र वाढताच फुटाळा चौपाटी आणि येथे लागलेल्या दुकान, हॉटेलमागे प्रेमीयुगुलांची, समाजकंटकांची वर्दळ असते. अनेकदा येथे नको ते प्रकार घडतात. प्रेमी युगुलांना लुटण्याच्या घटना हा नेहमीचा प्रकार आहे. हे सर्व माहीत असूनही फुटाळा चौपाटी मध्यरात्रीपर्यंत फुललेली दिसते. शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास निकिताच्या किंकाळ्यांनी फुटाळा चौपाटी थरारली.
लगेच पाच-पन्नास जणांनी ‘फुडीज फर्स्ट लव्ह’ रेस्टॉरंटकडे धाव घेतली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार निकिता रेस्टॉरंटच्या छतावरून खाली पडली होती. मोठ्या प्रमाणात शरीर जळाल्यामुळे असह्य वेदना होत असल्याने किंकाळ्या फोडण्यापलिकडे ती काहीही बोलू शकत नव्हती. पीएसआय बोरगे यांनी तिला आपल्या वाहनातून मेडिकलमध्ये नेताना वारंवार नातेवाईकांचे नाव किंवा मोबाईल क्रमांकाबाबत विचारणा केली. तिने कसाबसा मोबाईल क्रमांक सांगितला. तो तिचे वडील विष्णूदास फुलवानी यांचा होता.
फुलवानी यांना मोबाईलवरच निकिताबाबतची माहिती कळवून मेडिकलला बोलवून घेण्यात आले. तेथे फुलवानी यांनीही निकिताला ही थरारक घटना कशामुळे घडली त्याबाबत विचारणा केली. मात्र, ती बोलू शकली नाही. दरम्यान, तिची प्रकृती अत्यवस्थ होत असल्याचे पाहून नातेवाईकांनी तिला मेडिकलमधून खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांची चमू निकितावर अतिदक्षता विभागात उपचार करीत होते. (प्रतिनिधी)
मित्रानेच तिला जाळले?
निकिताला जाळले की ती स्वत: जळाली ते स्पष्ट झाले नसले तरी ती रेस्टॉरंटच्या छतावर जळताना काहींना दिसली. तेथूनच ती खाली पडली. त्यामुळे निकिता एकटी छतावर चढलीच कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच प्रश्नातून निकिता आपल्या कुण्या मित्रासोबत छतावर चढली असावी, तेथे त्यांच्यात वाद झाला असावा आणि तिने स्वत: किंवा त्याने तिला पेटवले असावे, असा कयास वर्तविला जात आहे. पोलीस तिच्यासोबत कोण होते आणि घटनेनंतर तो कुठे पळून गेला. त्याचाही आता शोध घेत आहेत.
तो तरुण जरीपटक्यातील
या घटनेच्या दोन तासानंतर फुटाळा तलावात उडी मारणाऱ्या तरुणाचे नाव क्रांतिकुमार गजभिये (वय २५) असून तोसुद्धा विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली. गजभिये जरीपटक्यातील पाटणकर चौकातील रहिवासी होय. त्याने तलावात उडी घेताच आजूबाजूच्यांनी आरडाओरड करून अंबाझरी पोलिसांना कळविले. पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलवून घेतले. मध्यरात्री १ वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांची तलावात शोधाशोध सुरू होती. या प्रकरणाचा निकिता प्रकरणाशी संबंध आहे काय त्याचाही तपास पोलीस करीत होते.सीसीटीव्ही कॅमेरे कधी लागणार
उपराजधानी दिवसेंदिवस संवेदनशील होत आहे. त्यामुळे शहरात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून सरकारकडे केली जाते. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने गुन्हेगारांचे फावते आहे. सीसीटीव्ही असेल तर गुन्हा कसा घडला आणि गुन्हेगार कोण त्याचा तातडीने छडा लावण्यास मदत होऊ शकते. निकिता प्रकरणात संशयकल्लोळ आहे. फुटाळा परिसरात सीसीटीव्ही असते तर पोलिसांना लगेच नेमका घटनाक्रम कळला असता.