निकिता म्हणते, मीच जाळून घेतले
By admin | Published: October 5, 2015 02:49 AM2015-10-05T02:49:06+5:302015-10-05T02:49:06+5:30
फुटाळा चौपाटीच्या एका हॉटेलसमोर संशयास्पदरीत्या जळाल्याने गंभीर भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी
बयाणानंतरही गूढ कायम: फुटाळा जळीत प्रकरण
नागपूर : फुटाळा चौपाटीच्या एका हॉटेलसमोर संशयास्पदरीत्या जळाल्याने गंभीर भाजलेली निकिता विष्णूदास फुलवानी (वय २२) हिचे पोलिसांनी रविवारी न्यायदंडाधिकाऱ्यासमोर बयाण नोंदवून घेतले. मात्र, तिने नेमके काय सांगितले आणि या प्रकरणामागील पार्श्वभूमी काय, त्याचा खुलासा न झाल्यामुळे हे प्रकरण अधिकच संशयास्पद ठरले आहे.
शनिवारी रात्री ९.३० च्या सुमारास फुटाळा चौपाटीवर असलेल्या ‘फुडीज फर्स्ट लव्ह’ रेस्टॉरेंटच्या छतावर निकिता जळाली. तिने स्वत:ला जाळून घेतले की कुणी तिला पेटवून दिले, हे स्पष्ट न झाल्यामुळे रात्रीपासून उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. निकिताची प्रकृती चिंताजनक असून, तिला मेडिकलमधून मध्यरात्री देवनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तेथे रविवारी दुपारी अंबाझरी पोलिसांनी विशेष न्यायदंडाधिकाऱ्यासमोर तिचे बयाण नोंदवून घेण्यात आले. यानंतर अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे आणि पोलीस दलाच्या प्रवक्त्या डीसीपी दीपाली मासिरकर यांनी रविवारी रात्री पत्रकारांना या घटनेची माहिती देताना व्यक्तिगत कारणामुळे निकिताने स्वत:ला पेटवून घेतल्याची माहिती दिली. ती अस्वस्थ होती हे व्यक्तिगत कारण त्यांनी स्पष्ट केले नाही. रविवारी दुपारी मैत्रिणीशी तिचे बोलणे झाले. रात्री ७ च्या सुमारास घरून बाहेर निघताना बाजारात जाते, असे तिने आईला सांगितले होते. त्यामुळे मैत्रीण किंवा कुटुंबीयांना त्यावेळी ती असे काही करेल याची पुसटशीही कल्पना आली नाही. ती आत्महत्या करण्याच्या मानसिकतेनेच फुटाळा तलावावर पोहचली. रस्त्यातून तिने एका बाटलीत पेट्रोल आणि माचिस विकत घेतली. त्यानंतर ती रेस्टॉरेंटच्या छतावर पोहचली. तेथे तिने स्वत:ला पेटवून घेतले. यावेळी तिच्यासोबत कुणीच नव्हते, असेही निकिताने सांगितल्याचे डीसीपी मासिरकर म्हणाल्या. पत्रकारांनी वारंवार विचारूनही कारण व्यक्तिगत असल्याने ते सांगता येणार नाही, असे मासिरकर म्हणाल्या. (प्रतिनिधी)
अनुत्तरित प्रश्न
निकिताने कोणत्या कारणामुळे स्वत:ला जाळून घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलले, तिने पेट्रोल, माचिस कुठून विकत घेतली, ती कोणत्या वाहनाने (स्वत:ची दुचाकी तिने घरीच ठेवल्याचे पोलीस सांगतात) फुटाळ्यावर पोहचली, आत्महत्या करण्यासाठी तिने फुटाळा चौपाटीसारखे वर्दळीचे ठिकाणच का निवडले, तिने कोणती चिठ्ठी लिहून ठेवली काय, घटनेपूर्वी तिचे मोबाईलवर कुणाकुणाशी संभाषण झाले, या प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडून मिळाले नाही. त्यामुळे या अनुत्तरित प्रश्नांनी या जळीत प्रकरणाचे गूढ अधिकच वाढवले आहे.
प्रकृती गंभीरच
निकिता हिला शनिवारी रात्री १०.५० मिनिटांनी खामला येथील एका खासगी इस्पितळात भरती करण्यात आले. इस्पितळाने दिलेल्या माहितीनुसार, निकिता ५० टक्के जळाली आहे. विशेषत: श्वसन नलिकेत खोलवर जखमा झाल्या आहेत. यामुळे तिला कृत्रिम श्वासोच्छवासवर ठेवण्यात आले आहे. तिचे डोके, मान, चेहरा, छाती, पाठीचा वरचा भाग, दोन्ही हातपाय जळाले आहे. बहुसंख्य जखमा या खोलवर गेल्या आहेत. सकाळी तिच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली. निकिताची प्रकृती गंभीर असून डॉक्टरांची एक चमू तिच्यावर लक्ष ठेवून आहे.
‘ फुडीज फर्स्ट लव्ह’ कुणाचे ?
फुटाळा चौपाटीचा काही भाग असामाजिक तत्त्वांचा अड्डाच बनला आहे. रात्र वाढते तसतशी येथे समाजकंटक, प्रेमीयुगुलांची गर्दी वाढते. त्यामुळे सभ्य महिला-पुरुषांनी इकडे फिरकणे बंद केले आहे. आले तरी येथील नकोसे प्रकार पाहून ते येथून लगेच निघून जातात. याउलट असामाजिक तत्त्व येथे मिळेल ती जागा बळकवात. प्रेमीयुगुलांची लूटही करतात. त्यांचे चित्रण करून त्यांना ब्लॅकमेलही करतात. ज्या ठिकाणी ही घटना घडली, ते ‘ फुडीज फर्स्ट लव्ह रेस्टॉरेंट’ कुणाचे हे स्पष्ट झाले नाही. हॉटेलच्या चक्क छतावर चढून नको ते प्रकार होत असताना हॉटेल मालक किंवा कुणाच्याच कसे लक्षात आले नाही, हासुद्धा खटकणारा प्रश्न आहे. हॉटेल मालकाने जिन्याला साधे दारही लावले नाही, याचा अर्थ काय, अशी अनेक जण विचारणा करीत आहेत.
‘त्याचा’ संबंध नाही
या घटनेच्या दोन तासानंतर क्रांतीकुमार भीमराव गजभिये (वय ३०) याने फुटाळा तलावात आत्महत्या केली. त्यामुळे जळीतकांडाशी हे प्रकरण संबंधित आहे काय, असा प्रश्न चर्चेला आला. मात्र, जरीपटक्यातील पाटणकर चौकाजवळ तो राहात होता. कॅटरिंगच्या व्यवसायाशी जुळलेला क्रांतीकुमार व्यावसायिक अडचणीमुळे त्रस्त असतानाच घरगुती कलह वाढल्याने तो अस्वस्थ झाला होता. शनिवारी रात्री असाच वाद झाल्याने त्याने ‘फुटाळळ्यावर जात आहो’ असे सांगूनच घर सोडले. मध्यरात्र झाली तरी तो घरी परतला नाही त्यामुळे चिंताग्रस्त झालेले त्याचे नातेवाईक शोधाशोध करीत फुटाळ्यावर पोहचले. क्रांतीकुमारचा भाऊ सुयत गजभिये यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. सोबतच या प्रकरणाचा जळीतकांडाशी संबंध नसल्याचेही स्पष्ट झाले.
माणुसकी हरविल्याच्या असह्य वेदना
एक असहाय तरुणी जळत असताना ५०-१०० जणांच्या जमावातील दोन-चारच जणांनी माणुसकी दाखवली. दुपट्ट्याने तिला विझविले. मात्र, गर्दीतील अनेक केवळ बघ्यांची भूमिका वठवित होते. काहींनी जळणाऱ्या निकितावर पाणी ओतून तिला दिलासा देण्याऐवजी बिसलरीच्या बाटल्या बगलेत दाबून तिचे जळताना मोबाईल शूटिंग केले. माणुसकीला काळीमा फासणारा हा प्रकार आता उघड झाला. भाजल्यामुळे असह्य वेदना अनुभवणाऱ्या निकिताला तशाही अवस्थेत मोबाईल क्लिपिंगने जास्त चटके दिले. पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना तिने ‘कुछ लोगोंने मोबाईल क्लिप बनाई. वो व्हायरल करेंगे’, असे म्हणून बदनामीची चिंता व्यक्त करून त्याची प्रचिती दिली.