नीलगायीसह तीन रानगव्यांचे सांगाडे सापडले
By admin | Published: May 24, 2017 04:34 PM2017-05-24T16:34:10+5:302017-05-24T16:34:10+5:30
जंगल व शेताच्या दरम्यान पुरलेले तीन रानगव्यांसह एका नीलगायीचे सांगाडे वनविभागाच्या विभागीय दक्षता पथकाने बुधवारी सकाळी खणून बाहेर काढले.
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- नवरगावलगत असलेल्या रत्नापूरमध्ये जंगल व शेताच्या दरम्यान पुरलेले तीन रानगव्यांसह एका नीलगायीचे सांगाडे वनविभागाच्या विभागीय दक्षता पथकाने बुधवारी सकाळी खणून बाहेर काढले.
दक्षता पथकाला एका निनावी फोनकर्त्याने, सदर भागात रानगवे व नीलगायीचे सांगाडे पुरले असल्याची माहिती दिली होती. या माहितीच्या आधारे या पथकाने आज सकाळी येथे खोदकाम सुरू केले तेव्हा त्यांना हे सांगाडे आढळून आले. यात आढळलेला अन्य एक सांगाडा कुठल्या पशूचा असावा याचा अंदाज पथकाला लावता आला नसून त्याचा तपास सुरू आहे. यापैकी नीलगायीचा सांगाडा पाहता तिचा मृत्यू एक ते दीड महिन्यांपूर्वी झाला असावा व रानगव्यांचा मृत्यू चार ते पाच महिन्यांपूर्वी झाला असावा असा अंदाज आहे. या परिसरात शेताच्या कुंपणात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
हे सांगाडे जमिनीत खड्डे खणून पुरण्याचे काम एकट्या माणसाकडून शक्य नाही त्यामुळे या प्रकारात बऱ्याच जणांचा हात असल्याचेही बोलले जात आहे.