नायलॉन मांजा प्रकरणी पहिली शिक्षा नागपुरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 11:09 PM2018-01-25T23:09:16+5:302018-01-25T23:10:09+5:30
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. खराडे यांनी गुरुवारी नायलॉन मांजा विक्रेत्याला १२ हजार रुपये दंडासह विविध प्रकारची शिक्षा सुनावली. नायलॉन मांजा प्रकरणात झालेली ही पहिलीच शिक्षा होय.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. खराडे यांनी गुरुवारी नायलॉन मांजा विक्रेत्याला १२ हजार रुपये दंडासह विविध प्रकारची शिक्षा सुनावली. नायलॉन मांजा प्रकरणात झालेली ही पहिलीच शिक्षा होय.
आसिफ अहमद अब्दुल अजीज असे आरोपी नायलॉन मांजा विक्रेत्याचे नाव असून, तो इतवारी येथील रहिवासी आहे. त्याने न्यायालयात गुन्हा कबूल केला. त्यामुळे त्याला भादंविच्या कलम २४१ अंतर्गत न्यायालय उठेपर्यंत उभे ठेवून १२ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला व दंड न भरल्यास सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच कलम १८८ अंतर्गत २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली.
१५ जानेवारी २०१७ रोजी आरोपी नायलॉन मांजाची विक्री करीत होता. दरम्यान, तहसील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे नायलॉन मांजाच्या ६६ चकऱ्या मिळून आल्या होत्या. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. व्ही. डी. हुकरे यांनी बाजू मांडली. सहायक पोलीस निरीक्षक युनूस मुलानी यांनी प्रकरणाचा तपास केला तर, पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार अनिल रघटाटे यांनी काम पाहिले.