निमगडे मर्डर मिस्ट्री, कहानी पुरी फिल्मी है....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:55+5:302021-03-20T04:07:55+5:30
तपास सीबीआयकडे : छडा लावला पोलिसांनी : तपासाचे मॉडेल ठरले प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशातील सर्वोच्च तपास ...
तपास सीबीआयकडे : छडा लावला पोलिसांनी : तपासाचे मॉडेल ठरले प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशातील सर्वोच्च तपास यंत्रणेपैकी एक मानल्या जाणाऱ्या सीबीआयकडे एखाद्या प्रकरणाचा तपास असतो. अनेक वर्षे तपास करूनही सीबीआयला त्यात कोणता धागादोरा मिळत नाही. हतबल होऊन ही तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात महत्त्वाची माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर करते. तरीसुद्धा सीबीआयला कोणतीही माहिती मिळत नाही. दुसरीकडे अपेक्षा नसताना अचानक त्याच प्रकरणाचा पोलीस छडा लावतात अन् त्यातील तब्बल नऊ आरोपींना सीबीआयला सोपविले जाते.
''कहानी पुरी फिल्मी हैं...'' अशासारखे हे प्रकरण नागपुरात घडले. ही घडामोड आता तपास यंत्रणांमध्ये ''मॉडल'' म्हणून पुढे आली आहे.
गुन्हेगारांच्या आपसी वैमनस्यातून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले करून त्यांचा खून पाडण्याच्या घटना नागपुरात नेहमीच घडतात. मात्र गुन्हेगारी किंवा गुन्हेगारांशी कवडीचा संबंध नसताना एखाद्या वृद्धावर बेछूट गोळ्या झाडून सिने स्टाइल हत्या होण्याची ही पहिलीच घटना होती. त्याचमुळे ६ सप्टेंबर २०१६ला झालेले आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्याकांड सर्वत्र चर्चेला आले होते.
ज्या पद्धतीने हे हत्याकांड घडले आणि त्यानंतर पाच वर्षांत ज्या नाट्यमय घडामोडी घडल्या, त्या एखाद्या चित्रपटातील कथानकासारख्याच वाटत होत्या. निमगडे यांची हत्या झाल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी तब्बल दीड ते दोन वर्षे पोलीस नुसते अंधारात चाचपडत होते. नमूद करण्यासारखी बाब अशी की, हत्याकांड सुपारी देऊन घडवून आणल्याची सर्वत्र चर्चा होती. सुपारी कशासाठी आणि कोणी दिली असेल ते संशयितही पोलिसांच्या टप्प्यात होते. त्यातल्यात्यात रंजित सफेलकर नावाचा राजकीय घोंगडे ओढून कडक कपड्यात वावरणारा कुख्यात गुंड, त्याचा राइट हॅन्ड कालू हाटे या गुंडांच्या सोबत सख्य असणारा शहबाज, नब्बू हे सर्वच्या सर्व पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. तरीसुद्धा त्यांना बोलते करण्यात आणि निमगडेच्या हत्याकांडाचे रहस्य उलगडण्यात तत्कालीन पोलिसांना यश आले नव्हते. त्यामुळे पुन्हा एक नाट्यमय घडामोड घडली आणि या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने दोन वर्षे या प्रकरणाचा कसून तपास केला. कोणताही धागादोरा हाती मिळत नसल्याचे पाहून सीबीआयने निमगडेच्या हत्याकांडातील आरोपी संबंधीची माहिती देणाऱ्यास पाच लाख रुपये पुरस्कार देण्याचे जाहीर केले. त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असेही स्पष्ट केले. मात्र या पुरस्कारालाही कुणाकडून दाद मिळाली नाही. त्यामुळे प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट अर्थात फाइल बंद करण्याच्या मन:स्थितीत सीबीआयचे अधिकारी होते. अशात नागपूर पोलिसांनी या मर्डर मिस्ट्रीचा उलगडा केला. नुसता उलगडा केला नाही तर प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी असलेल्या १९ पैकी ९ आरोपींना ताब्यात घेतले आणि सीबीआयकडे त्यांना सोपवले. चित्रपटात शोभेल अशीच ही घडामोड आहे.
---
----
पहिलेच उदाहरण
सीबीआयकडे तपास असताना त्या प्रकरणाचा स्थानिक पोलिसांनी छडा लावण्याची ही देशातील कदाचित पहिलीच घटना असावी, असा सूर यानिमित्ताने तपास यंत्रणांमधून उमटला आहे. कुछ खास है...अशी कौतुकाची थापही नागपूर पोलिसांना मिळत आहे.
---