निमगडे खुनाच्या तपासावरून सीबीआयला फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:08 AM2021-05-07T04:08:40+5:302021-05-07T04:08:40+5:30
नागपूर : सीबीआयला बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे खुनाच्या तपासाशी संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात अपयश आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या ...
नागपूर : सीबीआयला बहुचर्चित आर्किटेक्ट एकनाथ निमगडे खुनाच्या तपासाशी संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात अपयश आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी नाराजी व्यक्त केली. तसेच, यावरून सीबीआयची कानउघाडणीही केली.
गेल्या २७ एप्रिल रोजी न्यायालयाने सीबीआयला तपासाचा प्रगती अहवाल सादर करण्याचा आदेश दिला हाेात. त्यासाठी सीबीआयला ६ मेपर्यंत वेळ दिला हाेता; परंतु सीबीआयला या आदेशाचे पालन करण्यात अपयश आले. सीबीआयने याकरिता न्यायालयाला आणखी वेळ वाढवून मागितला. त्यावर याचिकाकर्ते अनुपम निमगडे यांनी आक्षेप घेतला. उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता; परंतु सीबीआयने केवळ वेळ गमावला. समाधानकारक तपास केला नाही, असा आरोप अनुपम यांनी केला. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सीबीआयला फटकारले व या प्रकरणावर उन्हाळ्याच्या सुट्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित करून तेव्हापर्यंत तपासाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी घडली होती. अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून एकनाथ निमगडे यांचा खून केला. दरम्यान, नागपूर पोलिसांना तातडीने आरोपींचा शोध घेण्यात अपयश आल्यामुळे अनुपम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने ती याचिका निकाली काढताना प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित केला होता. त्यानंतर तपासात समाधानकारक प्रगती झाली नसल्याचा अनुपम यांचा आरोप आहे. परिणामी, त्यांनी दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एकनाथ निमगडे त्यांचे वडील होते़