निमगडेंची सुपारी देणारा अंधारातच : मुख्य सूत्रधार सफेलकरकडून दिशाभूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 12:03 AM2021-04-02T00:03:40+5:302021-04-02T00:04:43+5:30
Nimgade murder case एकनाथ निमगडे हत्याकांडाचा खुलासा झाला असला तरी त्याची सुपारी नेमकी कुणी दिली, ते अद्याप उघड झालेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - एकनाथ निमगडे हत्याकांडाचा खुलासा झाला असला तरी त्याची सुपारी नेमकी कुणी दिली, ते अद्याप उघड झालेले नाही. यासंबंधाने मुख्य सूत्रधार रणजित सफेलकर याने पोलिसांना काही नावे सांगितल्याचे समजते. ती खरी आहेत की त्याने दिशाभूल करण्यासाठी ही नावे सांगितली, त्याचीही पोलीस चाैकशी करीत आहे. कोट्यवधी रुपयांच्या जमिनीच्या वादातून निमगडे यांची सुपारी घेऊन कुख्यात सफेलकरने हत्या करवून घेतल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात प्रत्यक्ष हत्या करणारे राजा, परवेज आणि बाबा हे तिघे वगळता अन्य १३ जणांना अटक केली. यात पाच कोटींची सुपारी घेणारा रणजित सफेलकर, त्याचे साथीदार कालू आणि भरत हाटे तसेच त्यांच्याकडून पावणेदोन कोटींची सुपारी घेऊन हे हत्याकांड करवणारा नब्बू तसेच अन्य ९ आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी निमगडेंच्या हत्याकांडांचा उलगडा केला असला तरी सफेलकरने ही सुपारी नेमकी कुणाकडून घेतली, ते अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांना त्याने काही नावे सांगितली. त्या नावाची पोलीस शहानिशा करीत आहेत. सफेलकरला त्यांच्यापैकीच कुणी सुपारी दिली की त्यांची नावे घुसवून तो पोलिसांच्या तपासाची दिशा बदलविण्याचा प्रयत्न करीत आहे, ते लवकरच स्पष्ट होणार आहे.