राष्ट्रवादीचे निमकर, राठी भाजपच्या वाटेवर
By admin | Published: May 8, 2015 02:10 AM2015-05-08T02:10:31+5:302015-05-08T02:10:31+5:30
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठा हादरा बसणार आहे.
नागपूर: जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला लवकरच मोठा हादरा बसणार आहे. राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सदानंद निमकर व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन राठी हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेणार आहेत. दोन्ही नेत्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी इराण दौऱ्यावरून नागपुरात परतल्यावर ते प्रवेश होईल.
निमकर यांनी तब्बल आठ वर्षे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केले आहे. प्रदेशवरही ते महत्त्वाच्या पदावर होते. जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष व काही काळ अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नितीन राठी यांनीही जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद भूषविले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांनी पक्षस्थापनेपासून पक्षात काम केले आहे. निमकर हे माजी मंत्री अनिल देशणुख यांचे तर राठी हे माजी मंत्री रमेश बंग यांचे निकटवर्तीय मानले जातात. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या दोन माजी मंत्र्यांच्या निकवर्तीयांनीच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने पक्षाची चिंता वाढली आहे.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना निमकर म्हणाले, मी पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीत आहे. सुरवातीला पक्षाचे काम चांगले चालले. नंतर मात्र डाऊन फॉल सुरू झाला. येथे पक्ष रुजत नाही. विदर्भातील नेते व कार्यकर्त्यांकडे पक्षश्रेष्ठींचे दुर्लक्ष झाले आहे. विदर्भातील नेत्यांना पाहिजे तशी ताकद देण्यात आली नाही. पक्षवाढीसाठी वरिष्ठ नेत्यांनी मदत दिली नाही. नुसते कार्यक्रम दिले. युती सरकारच्या काळात विदर्भातील भाजप-सेनेच्या नेत्यांचे पारडे जड असल्याचे स्पष्ट दिसते आहे. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्यावर आपली नाराजी नाही. अनिल देशमुख व रमेश बंग यांनी मला वेळोवेळी चांगली वागणूक दिली, असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले. नितीन राठी म्हणाले, आपण राष्ट्रवादीची धोरणे वेळोवेळी राबविली. पण नेत्यांना काटोल शिवाय दुसरे काहीच दिसले नाही. पक्षाकडे वारंवार विषय मांडूनही कुणी लक्ष दिले नाही. चार वर्षांपासून मी पक्षाच्या कार्यक्रमापासून स्वत:ला दूर ठेवले पण पक्ष सोडला नाही. शेवटी पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला, असेही राठी म्हणाले. (प्रतिनिधी)