नऊ टक्के शेतकऱ्यांना मिळाले पीककर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:11 AM2021-06-09T04:11:14+5:302021-06-09T04:11:14+5:30
पिक कर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँकेची उदासीनता.... राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता : ७६ कर्जदार सभासदांना कर्जवाटप साैरभ ढाेरे/अमाेल काळे लाेकमत न्यूज ...
पिक कर्ज वाटपाबाबत राष्ट्रीयकृत बँकेची उदासीनता....
राष्ट्रीयीकृत बँकांची उदासीनता : ७६ कर्जदार सभासदांना कर्जवाटप
साैरभ ढाेरे/अमाेल काळे
लाेकमत न्यूज नेटवर्क
काटाेल : चालू खरीप हंगामासाठी १५ एप्रिलपासून पीककर्ज वाटप प्रक्रिया सुरू करण्यात आली असली तरी काटाेल तालुक्यातील राष्ट्रीयीकृत व नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांनी त्यांच्या एकूण उद्दिष्टाच्या केवळ नऊ टक्के म्हणजेच ७६ शेतकऱ्यांना पीककर्ज दिले आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळविण्यासाठी बँक शाखांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
तालुक्यातील बँकांनी आजवर पीककर्ज वाटपाचे सरासरी ५.९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. मृग नक्षत्रात पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीच्या हालचालींना वेग दिला आहे. बहुतांश शेतकरी पिकांच्या मशागतीसाठी पीककर्ज घेत असल्याने तसेच या वर्षी अनेकांना पीककर्ज मिळण्यास उशीर हाेत असल्याने त्यांची अडचण हाेत आहे. राष्ट्रीयीकृत बँका दरवर्षी शेतकऱ्यांना पीककर्ज देतात आणि शेतकरी त्या कर्जाची परतफेड करीत नव्याने कर्जाची उचल करतात.
ही प्रक्रिया कित्येक वर्षांपासून सुरू आहे. तरीही राष्ट्रीयीकृत बँका विविध कागदपत्रांसाठी त्रास देत पीककर्ज मंजूर करण्यास दिरंगाई करीत असल्याचा आराेप अनेक शेतकऱ्यांनी केला. यावरून राष्ट्रीयीकृत बँकांची पीककर्ज वाटपातील उदासीनता स्पष्ट हाेते. राज्य शासनाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला निधी उपलब्ध करून दिल्यास पीककर्ज वाटपात वाढ होऊन अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणे सुलभ होईल, असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
....
११३.३७ कोटी रुपयांच्या पीककर्जाचे उद्दिष्ट
तालुक्यातील बँकांना ११३ कोटी ३७ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दिष्ट दिले हाेते. यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहा शाखांना ९ कोटी ४८ लाख रुपये तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या सर्व शाखांना १०३ कोटी ८९ लाख रुपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. या सर्व बँकांनी आजवर केवळ ७६ शेतकऱ्यांना ९ कोटी ४३ लाख रुपयांचे पीककर्ज दिले असून, यात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा वाटा ४ काेटी १२ लाख रुपयांचा आहे.
...
या बँकांनी पीककर्ज वाटप केले नाही
काटाेल तालुक्यातील बँक ऑफ इंडिया - झिल्पा, बँक ऑफ महाराष्ट्र - काटोल, सिंडिकेट बँक - काटोल, भारतीय स्टेट बँक - पारडसिंगा, मेंटपाजारा व कोंढाळी, आयसीआयसीआय बँक - मूर्ती, एचडीएफसी बँक - काटोल या बँक शाखांनी मंगळवार (दि. ८)पर्यंत एकाही शेतकऱ्याला पीककर्ज दिले नव्हते. तालुक्यात पीककर्ज वाटपात नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर आहे. या बँकेच्या सहा शाखांनी त्यांच्या उद्दिष्टाच्या ४४ टक्के आणि एकूण उद्दिष्टाच्या १२ टक्के पीककर्ज वाटप केले आहे.
....
राज्य शासनाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अधिकाधिक निधी उपलब्ध करून द्यावा. जेणेकरून शेतकऱ्यांना पीककर्ज मिळेल. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना नवीन पीककर्ज द्यावे.
- संदीप सरोदे, जिल्हाध्यक्ष
भाजप किसान मोर्चा, नागपूर.