राहुल आग्रेकरच्या दोन मारेकऱ्यांना नऊ दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 07:46 PM2017-11-30T19:46:10+5:302017-11-30T19:48:01+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर : लॉटरीचे व्यवसायी राहुल सुरेश आग्रेकर यांची एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून जिवंत जाळून हत्या करणाºया दोन आरोपींना गुरुवारी लकडगंज पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्तात बुरख्यांमध्ये प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. टी. खरडे यांच्या न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पंकज सुरेश हरोडे (३०) रा. आनंदनगर, यशोदरा आणि जॅकी मणिलाल प्रजापती (३२) रा. नरसिंगपूर मध्यप्रदेश, अशी आरोपींची नावे आहे.
पंकजला कोलकातानजीकच्या हावडा तर जॅकीला नरसिंगपूर येथे अटक करण्यात आली. दुर्गेश दशरथ बोकडे (३२) रा. राणी दुर्गावतीनगर हा फरार आहे. जॅकीचा प्रत्यक्ष खुनात सहभाग नाही. तो पंकजचा नातेवाईक आहे. पंकज आणि दुर्गेश यांनी अपहरण व खुनाचा गुन्हा केल्यानंतर ते सरळ जॅकीच्या नरसिंगपूर येथील गावी गेले होते. त्यांनी त्याला संपूर्ण घटना सांगितली होती. परंतु जॅकीने ही बाब पोलिसांना सांगितली नव्हती. त्यामुळे त्याला या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले.
२१ नोव्हेंबर २०१७ रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास आरोपींनी राहुलचे त्याच्या दारोडकर चौक येथील घरासमोरून अपहरण केले होते. त्याला आरोपींनी बोलेरोमधून नेले होते. आरोपींनी राहुलचा भाऊ जयेश यांच्या मोबाईलवर तीन वेळा एक कोटीच्या खंडणीसाठी फोन केले होते. त्यानंतर त्याला बुटीबोरी भागातील पेटीचुहा येथे नेऊन जिवंत जाळून त्याचा निर्घृण खून केला होता.
गुरुवारी तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही. खांडेकर यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. १३ डिसेंबरपर्यंत त्यांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी केली. न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला.