नागपुरात नऊ महिन्याच्या चिमुकलीचा ‘करंट’ लागल्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:04 AM2020-06-09T00:04:05+5:302020-06-09T00:05:31+5:30
नऊ महिन्याच्या चिमुकलीला कूलरचा ‘करंट’ लागल्यामुळे मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात ही करुणाजनक घटना घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नऊ महिन्याच्या चिमुकलीला कूलरचा ‘करंट’ लागल्यामुळे मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात ही करुणाजनक घटना घडली. श्रावणी धनराज दांडेकर असे मृत बालिकेचे नाव आहे. नऊ महिन्याच्या श्रावणीला घरात सोडून तिची आई घरकामात गुंतली. तिच्याजवळ आईने एक खेळणे सोडले. श्रावणीच्या हाताने ते खेळणे कूलरखाली गेले. त्यामुळे निरागस श्रावणी खेळण्याकडे रांगत गेली. खेळण्याला हात लावण्याच्या प्रयत्नात तिचा हात कूलरला लागला. त्यामुळे तिला जोरदार करंट लागला. ती बेशुद्ध पडली. घरकाम आटोपून आई घरात आली असता तिला चिमुकली श्रावणी निपचित पडलेली दिसली. तिने आरडाओरड करून शेजाऱ्यांना गोळा केले. श्रावणीला उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून इमामवाडा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.