फेब्रुवारीतील शांततेला मार्चच्या रक्तपाताने तडा; हत्यासत्राने पोलीस आणि नागरिकांचे वाढले टेन्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 01:12 PM2022-03-29T13:12:02+5:302022-03-29T17:38:11+5:30
रक्तपातविरहित फेब्रुवारीमुळे शहर पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसा झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्चच्या पहिल्याच आठवड्यातील शनिवारपासून रक्तपाताला सुरुवात झाली. आतापर्यंत खुनाच्या ९ घटना घडल्या आहेत.
नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात फेब्रुवारीमध्ये एकही खुनाची घटना पुढे आली नव्हती. हा एक रेकॉर्डही ठरला. रक्तपातविरहित फेब्रुवारीमुळे शहर पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसाही झाली. मात्र, हे कौतुक फार काळ टिकवता आले नाही. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यातील शनिवारपासून रक्तपाताला सुरुवात झाली. आतापर्यंत खुनाच्या नऊ घटना घडल्या आहेत.
शनिवारी, ५ मार्चच्या रात्री नंदनवन ठाण्याअंतर्गत वाठोडा रिंगरोडवर जायस्वाल दारू भट्टीजवळ राजू भगवानदास चेलीकसवाई (३५) याचा खून झाला. दारूच्या नशेत त्याचे मित्र अमन मेश्राम (२२) व अन्य मित्रांनी मिळून राजूचे डोके ठेचून काढले होते.
दुसरी घटना १२ मार्च रोजी एमआयडीसी येथील राजीवनगरमधील आहे. दूध विक्रेता विलास गवते याने त्याची पत्नी रंजना गवते (३६) व मुलगी अमृता गवते (१३) यांचा झोपेतच कोयत्याने गळा कापून खून केला. त्यानंतर १३ मार्चला नंदनवन झोपडपट्टीमध्ये शुभम नानोटे (२३) याचा खून त्याचा मोठा भाऊ नरेंद्र नानोटे (२७) याने आई रंजना नानोटे हिच्या मदतीने गळा दाबून केला. चौैथी घटना कळमना येथील आरटीओ कार्यालयाच्या समोर १५ मार्चला उघडकीस आली. दुपारी टायर मोल्डिंगचे काम करणाऱ्या आरोपीने ऑटोचालक विक्रांत ऊर्फ भुऱ्या बनकर (२४) याचा धारदार शस्त्राने गळा कापून खून केला. त्याच दिवशी पारडी चौकात सकाळी ५ वाजता मजुरीचे काम करणाऱ्या सोनू काशीराम बंसकरच्या डोक्यावर आरोपीने गट्टू मारून त्याचा खून केला.
मंगळवारी, २२ मार्चच्या रात्री कोतवाली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत शिवाजीनगर परिसरात खुनाची सहावी घटना उघडकीस आली. गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांनी शुल्लक वादावरून मनीष यादव (२५) याची धारदार शस्त्रांनी भोसकून काढले. बुधवारी, २३ मार्चच्या रात्री वाठोडा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत बीडगाव येथील प्लॅस्टिक कारखान्यात या महिन्यातील खुनाची सातवी घटना पुढे आली. कारखान्यातील मजूर सलीराम ऊर्फ रिंकू परासिया (३१) याचा त्याच्या अल्पवयीन साथीदारानेच दारूच्या नशेत डोक्यावर दांडा मारून जीव घेतला.
रविवारी, २७ मार्च रोजी कपिलनगर ठाण्याच्या क्षेत्रात उप्पलवाडी परिसरातील मैदानात समर्थनगर निवासी दीपा जुगल दास (४१) यांचे प्रेत आढळून आले. बस कंडक्टर असलेल्या दीपा दास यांचा खून त्यांची मैत्रीण स्वर्णा सोनी हिने पती सामी सोनी याच्या मदतीने केला. मार्च महिना संपण्यापूर्वीच नागपुरात नऊ खुनाच्या घटना घडल्याने पोलीस व नागरिकांचे टेन्शन वाढले आहे.
दरवर्षी जवळपास शंभर खून
नागपुरात प्रत्येक महिन्यात साधारणत: ८ ते दहा खुनाच्या घटना पुढे येतात. वर्षभरात हा आकडा शंभरच्या जवळपास पोहोचतो. त्याअनुषंगाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी खुनाच्या घटना रोखण्यासाठी सक्रिय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. अनेक गुन्हेगारांवर मकोका, एमपीडीए व हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतरही खुनाचे आकडे वाढत आहेत.
३० मार्चनंतर बोलू
या संदर्भात अपर पोलीस आयुक्त (क्राइम) सुनील फुलारी यांनी, या घटना म्हणजे तुम्हाला पोलिसांचे अपयश वाटत असेल तर आपण ३० मार्चनंतरच बोलू, असे सांगितले.