नागपुरात सहा महिन्याच्या चिमुकलीसह नऊ पॉझिटिव्ह : रुग्णसंख्या १६०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 11:12 PM2020-05-04T23:12:43+5:302020-05-04T23:21:12+5:30
शहरातील लॉकडाऊनचा वाढविलेला कालावधी पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा नऊ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, यात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच व सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील लॉकडाऊनचा वाढविलेला कालावधी पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे. आज पुन्हा नऊ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, यात सहा महिन्याच्या चिमुकल्यासह पाच व सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. या रुग्णांसह नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या १६० वर पोहचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, तीन अल्पवयीन व एका वृद्धासह सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली. नागपुरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ५६ झाली आहे.
नागपुरात मार्च महिन्यात १६ रुग्ण, एप्रिल महिन्यात १२२ रुग्ण तर मे महिन्याच्या चार तारखेपर्यंत २३ रुग्णांची नोंद झाली. रुग्णसंख्या वाढत असल्याने आणखी काही दिवस कठोरतेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. मेयोच्या प्रयोगशाळेत डोबीनगर मोमिनपुरा येथील रहिवासी ४० वर्षीय पुरुष व ३० वर्षीय महिलेचा नमुना पॉझिटिव्ह आला. हे दोघेही पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. मेडिकलच्या प्रयोगशाळेत यशोधरानगर येथील सातवर्षीय मुलाला कोरोना असल्याचे निदान झाले. हा मुलगा सिम्बोसीस येथे क्वारंटाईन होता. मेडिकलच्याच प्रयोगशाळेत सहा महिन्याची व पाच वर्षाचा मुलगी आणि २९ वर्षीय त्यांच्या आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. हे सतरंजीपुरा येथील रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वी यांना आमदार निवासात क्वारंटाईन करण्यात आले होते. याच प्रयोगशाळेतून सतरंजीपुरा येथील ३० वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली. नीरीच्या प्रयोगशाळेत डोबीनगर मोमिनपुरा येथील २१ व ४५ वर्षीय महिलेचा नमुनासुद्धा पॉझिटिव्ह आला. या दोघी पाचपावली पोलीस क्वॉर्टरमध्ये क्वारंटाईन होत्या. आज दिवसभरात एकूण नऊ रुग्णांचे निदान झाले असून रुग्णांची संख्या १६० झाली आहे.
आमदार निवासात आईने फोडला हंबरडा
सतरंजीपुरा येथील एकाच कुटुंबातील १५ सदस्य आमदार निवासात क्वारंटाईन आहेत. परंतु यातील सहा महिन्याची व पाच वर्षाची मुलगी आणि त्यांच्या २९ वर्षीय आईचा नमुना पॉझिटिव्ह आला. याला घेऊन तिच्या पतीने डॉक्टरांना जाब विचारला. या तिघांना रुग्णालयात नेण्यासाठी जेव्हा मनपाचे पथक आले तेव्हा त्या आईने हंबरडा फोडला. दोन मुलांचा सांभाळ कसा करणार म्हणून कुणाला तरी सोबत येऊ द्या, म्हणून डॉक्टरांकडे विनंती केली. तिच्या पतीने अणि सासूनेसुद्धा सोबत जाण्याची विनंती केली. परंतु पॉझिटिव्ह नमुने आलेल्यांनाच रुग्णालयात पाठविण्याचा नियम असल्याने त्यांचेही हात बांधले होते. या प्रकरणाच्या संदर्भात त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्याचेही समजते.
मेयोतून पाच तर मेडिकलमधून एकाला सुटी
मेयोमधून आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले. यात शांतिनगर येथील ११ वर्षीय मुलगी, याच वसाहतीतील १३ वर्षीय मुलगा, कुंदनलाल गुप्ता नगर येथील १५ वर्षीय मुलगा आणि दोन ४० वर्षीय पुरुष आहे. यातील एक सतरंजीपुरा तर एक शांतिनगर येथील रहिवासी आहे. अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, नोडल अधिकारी डॉ. रवी चव्हाण व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी या रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. मेडिकलमध्ये पॉझिटिव्ह म्हणून उपचार घेत असलेल्या ६१ वर्षीय रुग्णाने कोरोनावर मात केली. या ज्येष्ठाला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
-त्या कर्करोग रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह
२७ एप्रिल रोजी कामठी रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाºया एका कर्करोग रुग्णाचे नमुने खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आले होते. यामुळे या रुग्णाला मेयोत दाखल करण्यात आले. मेयोचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, या रुग्णाचे पुन्हा नमुने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सात दिवसांनी म्हणजे तीन व चार मे रोजी चोवीस तासांच्या अंतराने दोन नमुने तपासण्यात आले. याचा अहवाल निगेटिव्ह आला. यामुळे रुग्णाला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. पुन्हा त्याच खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित १८
दैनिक तपासणी नमुने १३९
दैनिक निगेटिव्ह नमुने १३२
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने १६०
नागपुरातील मृत्यू ०२
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ५६
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण १,५१७
क्वारन्टाईन कक्षात एकूण संशयित १,८०८
-पीडित-१६०-दुरुस्त-५६_-मृत्यू-२