‘आपली बस’ मध्ये दिवसाला नऊ हजार फुकटे प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 11:45 PM2018-03-21T23:45:00+5:302018-03-21T23:45:19+5:30
महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ ते ९ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. यामुळे परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे
लोकमत न्युज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या ‘आपली बस’ला गेल्या वर्षभरात ४८ कोटी ८२ हजार १७८ रुपयांचा तोटा झाला आहे. तोटा कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा परिवहन विभागाकडून केला जातो. परंतु शहर बसने दररोज प्रवास करणाऱ्या १ लाख ७७ हजार प्रवाशांपैकी ४ ते ६ टक्के म्हणजेच ८ ते ९ हजार प्रवासी विना तिकीट प्रवास करतात. यामुळे परिवहन विभागाला वर्षाला कोट्यवधींचा फटका बसत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याला वेळीच आळा न बसल्यास परिवहन विभागाच्या तोट्यात आणखी भर पडणार आहे.
वंश निमय यांच्याकडे शहर बसची जबाबदारी असताना दररोज १ लाख ६० हजार प्रवासी प्रवास करीत होते. आता ही जबाबदारी तीन आॅपरेटरकडे दिलेली आहे. मात्र प्रवाशांची संख्या १.७७ लाखांवर गेली आहे. यात फारशी वाढ झालेली नाही. प्रवाशांची संख्या चार लाखांवर गेली तरच परिवहन सेवा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविणे शक्य होईल. अशी माहिती परिवहन समितीचे उपसभापती प्रवीण भिसीकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नितीश ग्वालबंशी व नितीन साठवणे उपस्थित होते.
नागपूर शहरात ३५३ बसेस धावतात. डिसेंबर २०१६ पासून ‘ट्रायलरन’ व त्यानंतर १ मार्च २०१७ पासून पूर्णपणे शहर बस सेवा सुरू झाली. जानेवारी २०१८ रेडबसच्या माध्यमातून ५३ कोटी ९७ लाख ४ हजार २८४ रुपयाचे उत्पन्न झाले . तर या कालावधीत आॅपरेटरला १०१ कोटी ९७ लाख ८६ हजार ४६५ रुपयांचे भुगतान करण्यात आले आहे. म्हणजेच परिवहन विभागाला ४८.८२ कोटींचा तोटा झाला आहे. सर्व बसचे व्यवस्थापन व नियंत्रणाची जबाबदारी डिम्ट्स या आॅपरेटरकडे सोपविण्यात आली आहे़ मात्र या कंपनीचे नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.