नागपुरात ‘रेफर’ केलेल्या ९७ टक्के माता पडतात मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 12:44 PM2018-06-30T12:44:00+5:302018-06-30T12:47:14+5:30
नागपुरात डागासह, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतरही रुग्णालयांतून गंभीर स्थितीत मेडिकलमध्ये येणाऱ्या मातांचा मृत्यूदर तब्बल ९७ टक्के आहे.
सुमेध वाघमारे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात डागासह, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह इतरही रुग्णालयांतून गंभीर स्थितीत मेडिकलमध्ये येणाऱ्या मातांचा मृत्यूदर तब्बल ९७ टक्के आहे. तो कमी करण्यासाठी मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसुती विभागाने ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ प्रकल्प हाती घेतला आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने आणि हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी व गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असून मातामृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी ‘मॉडेल’ ठरणार आहे.
कमी हिमोग्लोबिन, उच्च रक्तदाब, अतिरक्तस्राव, पोटातील बाळाची अव्यवस्थित वाढ, कमी झालेली प्लेटलेटची संख्या ही अतिजोखमी मातांची लक्षणे आहेत. अशा मातांवर तातडीने उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने सोई उपलब्ध करून दिल्या असल्यातरी त्या तोकड्या पडतात. रुग्णालयात पोहचेपर्यंत माता अतिगंभीर अवस्थेत (शॉक) जातात. यातच त्यांचा मृत्यू होतो. मेडिकलमध्ये ‘रेफर’ केलेल्या अतिजोखमी माता मृत्यूचे प्रमाण ९७ ते ९८ टक्के आहे. मागील तीन महिन्यात असे ११०० रुग्ण मेडिकलमध्ये दाखल झाले आहेत. ‘रेफर’ केलेल्या माता मृत्यूचा दर थांबविण्यासाठी मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसलती विभागाचे प्रमुख डॉ. जे. आय. फिदवी यांच्या मार्गदर्शनात सहयोगी प्राध्यापक डॉ. आशिष झरारीया यांनी ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ हा प्रकल्प तयार केला आहे. आरोग्य विभागाच्या मदतीने आणि हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी व गेट्स फाऊंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविला जाणार आहे. संवाद, प्रशिक्षण आणि उपचार या तीन टप्प्याच्या मदतीने माता मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
-काय आहे ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’
डॉ. झरारीया यांनी सांगितले, सुरुवातीला हा प्रकल्प डागा, भंडारा जिल्हा रुग्णालय, रामटेक, उमरेड, हिंगणा उपजिल्हा रुग्णालयात राबविला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अतिरक्तस्रावांमुळे होणारा मातामृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मेडिकलच्या स्त्रीरोग विभागाने या पाचही रुग्णालयांसाठी ‘टोल फ्री क्रमांक’ उपलब्ध करून दिला आहे. यांच्यासेवेत २४ ही तास एक स्वतंत्र युनिट असणार आहे.
या रुग्णालयाकडे अतिजोखमीची माता येताच त्यांनी या ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’शी संपर्क साधून कुठून बोलत आहे, काय समस्या आहे, किती रक्तस्राव झाला किंवा रक्तदाब वाढलेला आहे आणि आता आम्ही काय करायचे आहे, एवढेच विचारायचे असून पलिकडून तज्ज्ञ डॉक्टर त्यावरील आवश्यक उपचार सुचविणार आहे.
प्रवेशद्वारावर स्ट्रेचरपासून ते शस्त्रक्रिया गृह असणार सज्ज
डॉ. झरारीया म्हणाले, टेलिफोनद्वारे उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्यास आणि रुग्ण मेडिकलमध्ये येत असल्यास अशा रुग्णांसाठी प्रवेशद्वारावरच स्ट्रेचरपासून ते शस्त्रक्रिया गृह सज्ज ठेवले जाणार आहे. तज्ज्ञ डॉक्टर, बधिरीकरण तज्ज्ञ व चमू तयार असणार आहे. शिवाय, संबंधित रक्त गटाची पिशवी व इतरही सोयी उपलब्ध करून दिले जाऊन माता मृत्यू रोखण्याचे प्रयत्न केले जाणार आहे.
माता मृत्य रोखणे शक्य
बहुसंख्य माता मृत्यू हा वाढलेला रक्तदाब, अतिरक्तस्राव व संसर्गामुळे होतो. यावर प्रतिबंध घालणे शक्य आहे. यासाठीच ‘रॅपीड रिस्पॉन्स टीम’ हा प्रकल्प हाती घेतला असून १ जुलैपासून याची सुरूवात होईल. या प्रकल्पाच्या मदतीने माता मृत्यू रोखणे शक्य होणार आहे.
-डॉ. जे. आय. फिदवी, विभाग प्रमुख,
स्त्रीरोग व प्रसूती विभाग मेडिकल.