पार्वतीच्या स्वरांनी निनादली ‘सरगम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 12:38 AM2017-10-02T00:38:58+5:302017-10-02T00:41:29+5:30
पार्वती नायर ही नागपुरातील गुणी गायिका. ही गायिका जितकी देखणी आहे तितकाच तिचा स्वरही गोड आहे. रविवारीही आपल्या याच स्वरांचा गोडवा उधळत तिने श्रोत्यांना भावविभोेर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पार्वती नायर ही नागपुरातील गुणी गायिका. ही गायिका जितकी देखणी आहे तितकाच तिचा स्वरही गोड आहे. रविवारीही आपल्या याच स्वरांचा गोडवा उधळत तिने श्रोत्यांना भावविभोेर केले. निमित्त सरगम ग्रुुपतर्फे आयोजित ‘सुरो की सरगम’ या संगीतमय कार्यक्रमाचे. एन. उन्नीकृष्णन यांची संकल्पना असलेला हा कार्यक्रम डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात नवोदित गायकांनी पहिल्यांदाच मिळालेल्या संधीचे खरचं सोने केले. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम...’ या गीताने पार्वतीने कार्यक्रमाचा प्रारंभ केला. यानंतर ‘बेदर्दी बालमा...’, ‘रूके रूके से कदम...’ असे सलग दोन गीत तिने आपल्या गोड आवाजात सादर केले. यानंतर मंचावर आले एन. उन्नीकृष्णन. ‘नागपूरचा येसूदास’ अशी ओळख असलेल्या एन. उन्नीकृष्णन यांनी आपल्या खास शैलीत ‘सुनयना...’ हे गीत सादर केले. पार्वती आणि प्रतीक जैनच्या ‘मेघा मेघा रे...’ या गाण्याने श्रोत्यांची विशेष दाद मिळवली. पार्वती व डॉ. निशिकांत लोखंडे यांच्या ‘मेरे ढोलना...’ या गीताने वन्समोअर मिळवले. या कार्यक्रमात सृष्टी काकानी, डॉ. प्रवीण जाधव यांच्या गाण्यांनीही माहोल केला. या गोड गळयाच्या गायकांना कि-बोर्डवर परिमल जोशी, गिटार- रॉबीन विलियम्स, बेस गिटार-अक्षय हरले, आॅक्टोपॅड-अंकित देशकर, ढोलक-पंकज यादव या वादकांनी सुरेल सहसंगत केली. निवेदन पुष्पा आनंद यांनी केले.
-अन् मंचावर अवतरला मेहमूद
गायनाच्या कार्यक्रमात नृत्याचा योग तसा फारसा येत नाही. पण, ‘सुरो की सरगम’ याला अपवाद ठरले. प्रतीक जैन हा गायक गुमनाम चित्रपटातील ‘हम काले हैं तो क्या हुवा...’ हे गाणे गायला मंचावर आला तोच मुळात मेहमूदच्या वेशभूषेत. टी-शर्ट, लुंगी आणि ‘हाफ मिशी’ अशा पेहरावातील सावळया वर्णाच्या प्रतीकने आपल्या नृत्य व गायनातून सभागृहात धम्माल उडवून दिली.