‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’ बालचित्रकला स्पर्धेत निर्भय, रेणुका व आईशी पुरस्काराचे मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 07:05 PM2017-12-18T19:05:42+5:302017-12-18T19:15:55+5:30
‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी रेणुका ओगानिया हिने तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिरच्या सातव्या वर्गाची विद्यार्थिनी आईशी डे हिने मिळविला.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : ‘वर्ल्ड आॅरेंज फेस्टिव्हल’च्या निमित्ताने आयोजित बालचित्रकला स्पर्धेचा प्रथम पुरस्कार स्कूल आॅफ स्कॉलर्सच्या सातव्या वर्गाचा विद्यार्थी निर्भय कुंभारे याने प्राप्त केला. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालयाची आठव्या वर्गाची विद्यार्थिनी रेणुका ओगानिया हिने तर तृतीय पुरस्कार भवन्स विद्या मंदिरच्या सातव्या वर्गाची विद्यार्थिनी आईशी डे हिने मिळविला.
‘लोकमत’ प्रस्तुत ‘सर जे.जे.स्कूल आॅफ आर्ट मुंबई’ व शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित ही बालचित्रकला स्पर्धा पाचवी ते आठवी वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांना ‘माझे शहर’ व ‘सहल’ हे दोन विषय देण्यात आले होते. अनेकांनी ‘माझे शहर’ हाच विषय हाताळला. यात मेडिकल चौकापासून ते संविधान चौक, सीताबर्डीतील गर्दी, उड्डाण पूल, अंबाझरी गार्डन एवढेच नव्हे तर काहींनी नागपूरचे रेल्वे स्टेशन, बसस्थानकापासून ते मेट्रो रेल्वेसाठी उभे केलेले पिलर्सही आपल्या कुंचल्यातून साकारले. ‘सहल’ या विषयाला घेऊन साकारण्यात आलेल्या चित्रात अनेक चिमुकल्यांनी महाराजबागेसह इतर उद्यानातील चित्र रेखाटले. या स्पर्धेच्यानिमित्ताने स्वत:ला व्यक्त करण्याची आणि कल्पकता दाखविण्याची सुवर्णसंधीच विद्यार्थ्यांना मिळाली होती. स्पर्धेचे परीक्षण प्रा. शशिकांत ढोकणे, प्रा. श्रीकांत गडकरी व प्रा. बाबर शरीफ यांनी केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण सोमवारी सिव्हिल लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडले. यावेळी सर जे.जे. स्कूल आॅफ आर्ट मुंबईचे प्रा. शशिकांत काकडे, प्रा. विजय बोंधर, प्रा. यशवंत भाऊसार, प्रा. नितीन पाटील, शासकीय चित्रकला महाविद्यालय नागपूरचे प्रा. संजय जठार, प्रा. किशोर इंगळे, प्रा. पंकज इटकेलवार आदी उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संचालन नेहा जोशी यांनी केले.
विजेत्यांची नावे
प्रथम पुरस्कार (पाच हजार रुपये) निर्भय कुंभारे (स्कूल आॅफ स्कॉलर्स), द्वितीय पुरस्कार (तीन हजार रुपये) रेणुका ओगानिया (श्रीनिकेतन माध्यमिक विद्यालय), तृतीय पुरस्कार (दोन हजार रुपये) आईशी डे (भवन्स विद्या मंदिर) ,प्रोत्साहन पुरस्कार (एक हजार रुपये) अथर्व जाधव (न्यू इंग्लिश हायस्कूल), साहिल सहारे (मंदिर पब्लिक स्कूल), रूपेश ठवकर (दुर्गा नगर हायस्कूल), मानसी अग्रवाल (भवन्स विद्या मंदिर सिव्हिल लाईन्स), गिरीश थमोभ (एसएफएस हायस्कूल), मानसी गुप्ता (दुर्गानगर हायस्कूल), ईशा सोमकुवर (जिंदल विद्या मंदिर) व रुद्रांश त्रिपाठी (जिंदल विद्यामंदिर).