निसर्गरम्य टेकडीवर साकारतेय ‘निसर्ग निर्वचन केंद्र’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 12:09 PM2021-07-31T12:09:43+5:302021-07-31T12:11:12+5:30

Nagpur News शमी विघ्नेश्वराच्या तीर्थ स्थळासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र आदासा येथील निसर्गरम्य टेकडीवर वनविभागाच्या माध्यमातून ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ साकारण्यात येत आहे.

'Nisarg Nirvachan Kendra' is taking place on a scenic hill. | निसर्गरम्य टेकडीवर साकारतेय ‘निसर्ग निर्वचन केंद्र’

निसर्गरम्य टेकडीवर साकारतेय ‘निसर्ग निर्वचन केंद्र’

googlenewsNext
ठळक मुद्देएकाच छताखाली मिळेल वन्यजीव, पक्षी, वृक्षांची माहिती : वनविभागाचा उपक्रम

विजय नागपुरे

 लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शमी विघ्नेश्वराच्या तीर्थ स्थळासाठी सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र आदासा येथील निसर्गरम्य टेकडीवर वनविभागाच्या माध्यमातून ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ साकारण्यात येत आहे. येथे मंदिरात आलेल्या भाविकांना शमी विघ्नेश्वराच्या दर्शनासोबतच या केंद्रात एकाच छताखाली वन्यजीव, पक्षी, वृक्षांची माहिती मिळेल. तसेच निसर्गाशी सुखसंवाद साधण्याचे माध्यम म्हणून हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

जंगल आणि मानव हे नाते अनादी काळापासून आहे. पृथ्वीचा बहुतांश भाग जंगलांनी व्यापला होता. ही जंगले माणूस व इतर वन्य जीवांचे निवासस्थान होते. जसजसा काळ पुढे गेला तस-तशी वाढती लोकसंख्या आणि आर्थिक घडामोडीमुळे नैसर्गिक संसाधनांची गरज वाढत जाऊन जंगले कमी होऊ लागली. मानवी वस्ती वाढत गेल्यामुळे जंगलाचे क्षेत्र कमी झाले. तसेच वन्यजिवांचे अधिवास आणि जैवविविधतादेखील कमी होऊ लागली. यातून मार्ग काढीत वनव्यवस्थापन आणि संवर्धनाच्या चांगल्या पद्धतीचा अवलंब करत वनक्षेत्र वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता ‘निसर्ग निर्वचन केंद्र’ मनुष्याला निसर्गाशी जोडण्यास महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

             श्रीक्षेत्र आदासा येथे सर्व्हे नंबर ७३ व सर्व्हे नंबर २४० अशा दोन गटांत एकूण ३८.२५ हेक्टर क्षेत्रफळ असलेला परिसर वनविभागाच्या ताब्यात आहे. यापैकी मंदिर परिसराला लागून असलेल्या टेकडीवरच ‘निसर्ग निर्वचन केंद्राची’ इमारत बांधकाम करण्यासाठी २०१३-१४ मध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. या इमारतीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. २०१८ ला इमारतीचा ताबा वनविभागाला देण्यात आला. यानंतर २०२० पासून त्याकरिता १ कोटी ३९ लाख रुपयांचा निधी जिल्हा वार्षिक नियोजन समिती अंतर्गत मंजूर करण्यात आला.

ही कामे करण्यासाठी पर्यावरण शिक्षण केंद्र, अहमदाबाद यांच्याशी करार करण्यात आला असून, या इमारतीत पाच दालन व एका सभागृहात विविध कामे सुरु आहेत.

इमारतीत प्रवेश करताच हत्ती व पिलांचे थ्री डी पुतळे येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. तर विविध दालनात हत्तींची ओळख, विज्ञान, उत्क्रांती आणि हत्तींचे विविध प्रकार, जीवन चक्र, परिस्थिती संवर्धनाचे उद्देश व मापदंड, भारत व त्याचे भौगोलिक प्रदेश, महाराष्ट्राची जैवविविधता, राज्य फुल, राज्यपक्षी, राज्य फुलपाखरू, राज्य वृक्ष, थ्री डी सिनेमा आदीबाबत पुतळे, मशीन व चित्रांद्वारे माहिती मिळणार आहे.

या परिसरात निसर्ग वाट, तिकीट घर आदी कामे सुरू असून १,१११ रोपांची लागवड करण्यात आलेली आहे. यात कडूलिंब, वड, पिंपळ,करंजी, उंबर, बेल तसेच औषधी वनस्पती प्रजातीचा समावेश आहे.

भविष्यात येथे असलेल्या भौगोलिक परिस्थितीचा वापर करून वनविभागाचा येथे साहसी पार्क तयार करण्याचा मानस आहे. सदर कामी गावाचे सहकार्य व सक्रिय सहभाग वाढावा याकरिता सोनपूर आदासा येथे संयुक्त वन व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

अर्चना नौकरकर

वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविभाग कळमेश्वर

Web Title: 'Nisarg Nirvachan Kendra' is taking place on a scenic hill.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Natureनिसर्ग