लाच घेताना एनआयटीचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2021 10:24 AM2021-11-11T10:24:47+5:302021-11-11T10:40:14+5:30

शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या वृद्धाकडून भूखंडाचे प्लॉटचे डिमांड लेटर व आरएल लेटर काढून देण्यासाठी १५ हजारांची लाच मागणाऱ्या एनआयटीच्या शिपायाला एसीबीने अटक केली आहे.

NIT worker caught red handed by acb while accepting bribe | लाच घेताना एनआयटीचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात

लाच घेताना एनआयटीचा शिपाई एसीबीच्या जाळ्यात

Next
ठळक मुद्देकळमनाच्या विभागीय कार्यालयात कारवाई

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) एनआयटीच्या शिपायाला १५ हजारांची लाच घेताना अटक केली आहे. खूप दिवसांनंतर एनआयटीचा कर्मचारी लाच घेताना सापडला आहे. विजय गौरीनंदनसिंह चौहाण (वय ५०) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकारामुळे एनआयटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

आरोपी चौहाण एनआयटीच्या पूर्व विभागीय कार्यालयात शिपाई आहे. तर, तक्रारकर्ता हे सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी आहेत. त्यांनी भामटीत दोन प्लॉट खरेदी केले होते. प्लॉटचे डिमांड लेटर तसेच आर. एल. लेटरसाठी त्यांनी २७ एप्रिल आणि ४ ऑक्टोबरला एनआयटीच्या कळमना येथील विभागीय कार्यालयात अर्ज केला होता. त्या अर्जावर काहीच कारवाई न झाल्यामुळे त्यांनी शिपाई चौहाण याच्याशी संपर्क साधला.

चौहाणने एका महिन्यात काम करून देतो असे सांगून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. त्यानंतर चौहाणने तक्रारकर्त्याला कार्यालयात बोलावून चलानचे १७ हजार रुपये मागितले. १७ हजार रुपये नसल्यामुुळे तक्रारकर्त्याने चौहाणला चार हजार रुपये दिले. उर्वरित रक्कम दुसऱ्या दिवशी खामलात सोपविले. त्याची चौहाणने तक्रारकर्त्याला पावतीही दिली नाही. त्यानंतर चौहाणने तक्रारकर्त्याला दोन्ही प्लॉटचे डिमांड आणि आर. एल. लेटर काढून देण्यासाठी ५० हजार मागितले. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे तक्रारकर्त्याने एसीबीत तक्रार दिली. प्राथमिक तपासात खात्री झाल्यानंतर एसीबीने चौहाणला पकडण्याची योजना आखली. चौहाणने ५० हजारांपैकी बुधवारी १५ हजार रुपये देण्यास सांगितले. तक्रारकर्ते पैसे घेऊन कळमना येथील एनआयटीच्या विभागीय कार्यालयात पोहोचले. तेथे त्यांच्याकडून पैसे घेताना एसीबीने त्याला रंगेहात अटक केली.

त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगिता चाफले, निरीक्षक संजीवनी थोरात, अचल हरगुडे, अनिल बहिरे, अमोल मेंघरे, निशा उमरेडकर, रेखा यादव, सदानंद सिरसाठ यांनी पार पाडली.

समोर आले नाहीत खरे चेहरे

ज्या कामासाठी तक्रारकर्त्याला लाच मागण्यात आली, त्या कामाचा चौहाणशी काहीच संबंध नाही. अशा स्थितीत ज्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने डिमांड लेटर तसेच आरएल जारी करण्याची जबाबदारी आहे त्यांचा चौहाणशी काय संबंध आहे हा तपासाचा विषय आहे. लाचखोरीसाठी चर्चेत असलेल्या बहुतांश कार्यालयात शिपाई किंवा दलालाच्या माध्यमातून वसुली करण्यात येते. या दिशेने तपास केल्यास चौहाणशी निगडित अनेक चेहरे समोर येऊ शकतात.

Web Title: NIT worker caught red handed by acb while accepting bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.