Nitin Deshmukh: ‘माझ्याशी दहशतवाद्याप्रमाणे वर्तन’, नितीन देशमुख यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 07:52 AM2022-06-23T07:52:51+5:302022-06-23T07:53:45+5:30
Nitin Deshmukh: एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी घरवापसी केली. नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये स्थानिक पोलिसांनी त्यांच्याशी दहशतवादी असल्याप्रमाणेच वर्तणूक केल्याचा आरोप केला.
- योगेश पांडे
नागपूर : एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी घरवापसी केली. नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये स्थानिक पोलिसांनी त्यांच्याशी दहशतवादी असल्याप्रमाणेच वर्तणूक केल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी विश्वासात न घेता सुरतला नेले होते. मी नेहमी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेन, असे त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेंच्या सांगण्यानुसार त्यांच्या गाडीत बसलो. मात्र, सुरतला गेल्यावर तेथून निघण्याचा प्रयत्न केला; परंतु गुजरात पोलिसांनी माझ्यावर पहारा ठेवला. मी हॉटेलमधून पलायन केले. पहाटे ३ वाजता दीडशे पोलीस मागे लागले होते. मी वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात होतो. मात्र, फोनची बॅटरी डाऊन झाली व त्यात पाऊसदेखील होता. त्यामुळे व्हॉटस्ॲप लोकेशन शेअर करता आले नाही. मला पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेले. २०-२५ जणांनी मला पकडले व इंजेक्शन टोचले. त्यानंतर मला झोप लागली. मला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले. मात्र ते खोटे होते.
शिंदेंकडून अनेक आमदारांचा विश्वासघात
- कुठलीही पूर्वकल्पना न देता एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सुरत व तेथून गुवाहाटीला नेले. माझ्याप्रमाणेच इतरही काही आमदारांची मनःस्थिती आहे. मात्र, ते तेथून निघू शकले नाहीत.
- मी शिवसैनिक, उद्धव ठाकरे व अरविंद सावंत यांच्यामुळे आमदार झालो असून, माझ्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत. मी नेहमी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.