पदभार स्विकारण्याअगोदरच नितीन गडकरी ‘अ‍ॅक्टीव्ह’, नागपुरात जाणून घेतल्या सिंचन विभागातील समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2017 04:17 PM2017-09-04T16:17:13+5:302017-09-04T16:17:31+5:30

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Nitin Gadkari 'Active', before taking over the charge, problems in the irrigation department | पदभार स्विकारण्याअगोदरच नितीन गडकरी ‘अ‍ॅक्टीव्ह’, नागपुरात जाणून घेतल्या सिंचन विभागातील समस्या

पदभार स्विकारण्याअगोदरच नितीन गडकरी ‘अ‍ॅक्टीव्ह’, नागपुरात जाणून घेतल्या सिंचन विभागातील समस्या

नागपूर, दि. 4 - केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जलसंपदा, नदी विकास व गंगा पुनरुत्थान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आपल्या ‘हटके’ कार्यप्रणालीसाठी परिचित असलेले गडकरींनी पदभार स्विकारण्याअगोदरच आपल्या अभ्यासू वृत्तीने कामाला सुरुवात केली. रविवारीच त्यांनी सिंचन तज्ज्ञांशी चर्चा केली आणि विविध अडचणी व समस्या जाणून घेतल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गडकरी यांचा सिंचनप्रकल्पांवर अगोदरपासूनच अभ्यास आहे. मंत्री नसतानादेखील या प्रकल्पांना गती मिळावी यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. नवी दिल्लीत मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर गडकरी रविवारी नागपूरला आले.  निवासस्थानी निवांत वेळ न घालवता त्यांनी तातडीने सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांना तसेच विभागातील अधिका-यांना बोलावून घेतले. राज्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत येणा-या प्रकल्पांची स्थिती, गोसेखुर्दसमोरील आव्हाने तसेच भूजलपातळी वाढविण्यासंबंधी उचलण्यात आलेली पावले यासंदर्भात जाणून घेतले. या कामांना गती देण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना आवश्यक आहे याबाबतदेखील त्यांनी तज्ज्ञांचे विचार ऐकले. राज्यातील २६ प्रकल्प पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे. या प्रकल्पांना एकूण १८ हजार ६५४ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यात केंद्र शासनाचा वाटा हा १० हजार ६१५ कोटी ६२ लाख ९० हजार इतका आहे हे विशेष.

रविवारी तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर गडकरी यांनी तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यांचा व मांडलेल्या अडचणींचा अभ्यास केला. सोमवारी सकाळी ते नवी दिल्लीकडे रवाना झाले. मात्र अगोदरच अभ्यासू वृत्ती असलेले गडकरी विभागाचा गृहपाठ करुन पदभार स्विकारण्यासाठी गेले असल्यामुळे या विभागातदेखील ते धडाकेबाज कामगिरी करुन दाखवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Nitin Gadkari 'Active', before taking over the charge, problems in the irrigation department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.