नितीन गडकरी यांनी उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, नाना पटोलेंचा उच्च न्यायालयात दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2021 05:37 PM2021-10-08T17:37:21+5:302021-10-08T17:58:00+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यात, गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमक्ष केला.
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धच्या निवडणूक याचिकेवर आज शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली. यात, गडकरी यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती लपवून ठेवली, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील ॲड. सतीश उके यांनी केला आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व सुरेश हेडाऊ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरुद्धची निवडणूक याचिका न्यायालयात दाखल आहे. त्यावर न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष आज सुनावणी झाली. उके यांनी याचिकेचे जोरदार समर्थन करून विविध मुद्दे मांडले.
गडकरी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये नामनिर्देशनपत्रासोबतच्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, त्यांनी उत्पन्न लपवून ठेवले. त्यामुळे मतदारांना सत्य माहिती कळू शकली नाही, असे उके म्हणाले. तसेच, गडकरी यांनी उत्पन्नाचा स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले आहे. परंतु, त्यांच्या नावावर कुठेही शेती नाही. त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ चार ते पाच कोटी रुपयाची मालमत्ता दाखवली आहे, ही माहिती खरी नाही. त्यांची मालमत्ता हजारो कोटीत आहे, असेही ॲड. उके यांनी सांगितले.
याशिवाय त्यांनी प्रतिज्ञापत्रातील विविध आक्षेपार्ह बाबी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. दरम्यान, न्यायालयाचा वेळ संपल्यामुळे या प्रकरणावर १४ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी निश्चित करण्यात आली.