सकारात्मक वृत्तीने मार्गक्रमण करा; करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना गडकरींचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2022 11:09 AM2022-05-31T11:09:51+5:302022-05-31T11:47:06+5:30

नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे पॅकेज गडकरींच्या हस्ते देण्यात आले.

Nitin Gadkari Distributes Financial Aid of 15 lakh package to 79 children who lost their parents due to corona | सकारात्मक वृत्तीने मार्गक्रमण करा; करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना गडकरींचे आवाहन

सकारात्मक वृत्तीने मार्गक्रमण करा; करोनामुळे पालक गमावलेल्या बालकांना गडकरींचे आवाहन

Next
ठळक मुद्देपंतप्रधान मोदींनी साधला ऑनलाईन संवाद

नागपूर : तुमच्या आयुष्यात झालेली दुर्घटना जीवनात अंधकार निर्माण करणारी आहे. मात्र, यातून सकारात्मक वृत्तीने बाहेर पडणे आवश्यक आहे. शासन कायम तुमच्या पाठीशी आहे. निराश न होता पुढील मार्गक्रमण करा, आकाशी झेप घ्या, असे भावनिक आवाहन केंद्रीय महामार्ग व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

कोरोना महामारीमध्ये ज्यांचे आई-वडील मृत्युमुखी पडले, अशा अनाथ बालकांसोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात महिला व बाल कल्याण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रधानमंत्री मोदी यांच्या मार्गदर्शनानंतर जिल्ह्यातील अनाथ बालकांशी गडकरी यांनी संवाद साधला. नागपूर जिल्ह्यात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या ७९ आहे. त्यांना सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पंधरा लाखांचे पॅकेज गडकरींच्या हस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आमदार विकास कुंभारे, टेकचंद सावरकर, जिल्हाधिकारी आर. विमला, महिला व बाल विकास विभागाचे विभागीय उपायुक्त रवी पाटील उपस्थित होते.

केंद्र शासनासोबत राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळावा, यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत. या मुलांना आयुष्यात प्रतिष्ठा आणि संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार या मुलांच्या शिक्षणाची, आरोग्याची, निवाऱ्याची व्यवस्था शासन करणार आहे. या संदर्भातील सर्व दस्तऐवज व स्नेह प्रमाणपत्र मुलांना वितरीत केले गेले.

प्रधानमंत्र्यांनी मुलांना दिला कठोर परिश्रमाचा संदेश

प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावपूर्ण निवेदनात बालकांना तुमच्या दु:खाची भरपाई होऊ शकत नाही. मात्र, ज्यांच्या आयुष्यात संघर्ष आला. त्यांनाच मोठे होता आले. त्यामुळे हार न मानता लढा, परिश्रम करा, असे आवाहन केले. केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी सेवा हेच कर्म मानणाऱ्या शासनाची ही भावनिक पूर्तता असल्याचे सांगितले.

अशी आहे मदत

कोरोना महामारीमुळे आपले आई-वडील गमावलेल्या मुलांना ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड’ निधीतून दहा लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात आहे. या मुलांना वयाच्या २३ वर्षापर्यंत मासिक स्टायपेंड देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय आयुष्यमान भारत योजनेतून मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा दिला जाणार आहे. त्याचा प्रीमियम देखील पीएम केअर्स फंडातून भरला जाणार आहे. याशिवाय सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.

नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे दहा हजारांवर मृत्यू

एकट्या नागपूर जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दहा हजारांवर आहे. यात २७०० मुलांचे आई किंवा वडील गेलेल्याचा समावेश आहे. ७९ मुलांचे आई आणि वडील दोघेही या महामारीत मृत्युमुखी पडले आहेत. काहींच्या नातेवाइकांनी त्यांना स्वीकारले नाही. अशा मुलांची काळजी शासन घेत आहे.

Web Title: Nitin Gadkari Distributes Financial Aid of 15 lakh package to 79 children who lost their parents due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.