Nitin Gadkari: सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, गडकरींचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 09:43 PM2022-09-10T21:43:33+5:302022-09-10T21:45:19+5:30
Nitin Gadkari: नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.
मुंबई - भाजपमधील मोठ्या संघटनात्मक बदलांमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आले. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान देण्यात आले आहे. त्यानंतर, गडकरींचं एका कार्यक्रमातील विधान चांगलंच गाजलं होतं. राजकारणाविषयी त्यांनी आपली भूमिका मांडली होती, सध्याच्या राजकारणात अस्वस्थ होत असल्याचं ते म्हणाले होते. त्यानंतर, आता पुन्हा एकदा गडकरींनी सरकारवर तोफ डागली आहे. सरकारच्या भरोशावर राहू नका, असे विधान गडकरींनी शेतकऱ्यांना उद्देशून केलं आहे.
नागपुरात अॅग्रो व्हिजन फाउंडेशनच्या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. विदर्भातील फळ आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी संधी या विषयावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माझं मार्केट मी शोधलं आहे, तुमचं मार्केट तुम्ही शोधा, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari) यांनी भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे. एवढंच नाही तर शेतकऱ्यांनी सरकारवर फारसं अवलंबून राहू नये, मी स्वतः सरकारमध्ये आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय, असेही ते पुढे म्हणाले.
प्रगतशील शेतकऱ्यांचा आदर्श घ्या
"सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकारमध्ये आहे म्हणून सांगतो. कृषी क्षेत्रात विकास करायचा असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेतला पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता स्वतः कृती करायला पाहिजे. ज्या शेतकऱ्यांनी प्रगती केली आहे, अशा शेतकऱ्यांचा आदर्श घ्या", असा सल्ला नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.
दरम्यान, गडकरी यांनी सरकारच्या कामकाजावर अनेकदा टीकाही केली आहे. तर, सरकार वेळेवर निर्णय घेत नसल्याचेही त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटले होते. आपल्या बिनधास्त स्वभावामुळे इतर पक्षातील नेतेही त्यांचे चाहते आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गडकरी यांना खुली ऑफर देत आम्ही त्यांना साथ देत असल्याचं म्हटलं होतं. आता, शेतकऱ्यांना उद्देशून बोलताना गडकरींनी सरकारच्या विश्वासावर राहू नका, असे म्हटले आहे.