कर्मचाऱ्यांनो वीजचोरी थांबवा अन्यथा... नितीन गडकरींचा वीज कर्मचाऱ्यांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 10:26 AM2021-12-19T10:26:53+5:302021-12-19T10:34:35+5:30
वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीज चोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचार सोडून वीज कर्मचार्यांनी त्वरीत वीज चोरी थांबवावी असे आवाहन केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी केले.
नागपूर : वीज कर्मचाऱ्यांनी जर महावितरणची वीजचोरी थांबवली नाही तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी त्वरित वीज चोरी थांबवावी, असे आवाहन केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारतीय मजदूर संघाच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे नववे अधिवेशन शनिवारी रेशिमबाग स्मृती मंदिर परिसरातील महर्षी व्यास सभागृहात पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी जयप्रकाश होळीकर होते. तसेच अमरसिंग ताखला, एल. पी. कटकवार, बाबासाहेब हरदास, अन्ना देसाई, दत्ता धामनकर, अनिल ढोमणे आदी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, जनरेशन कॉस्ट कमी झाली पाहिजे. आकोडा टाकून, वीज चोरी केली तर देशाचे काय होईल, राज्याचे काय होईल हे आत्ता सांगत नाही. पण तुम्ही वीज चोरी थांबवली नाही तर तुमच्या नोकऱ्या गेल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा देशहितासाठी मी वीज चोरी होऊ देणार नाही, अशी शपथ घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. प्रास्ताविक सुभाष सावजी यांनी केले. संचालन शंकर पहाडे यांनी तर सुनील बोक्षे यांनी आभार मानले.