मा गो वैद्य शतायुषी होतील, असा विश्वास होता पण...; नितीन गडकरींनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2020 04:51 PM2020-12-19T16:51:41+5:302020-12-19T16:52:45+5:30
Ma Go Vaidya : मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी दुपारी 3.30 वाजता निधन झाले.
नागपूर : आरएसएसचे पहिले प्रवक्ते मा गो वैद्य यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षांचे होते. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते, असे गडकरी म्हणाले. तसेच विधान परिषद सदस्य म्हणून त्यांची कारकीर्द सगळ्या लोकप्रतिनिधींसाठी सदैव आदर्शवत राहील. माझ्या लहानपणापासून बाबुरावजींशी माझा व्यक्तिगत व जवळचा संबंध राहिला आहे. मला कायम त्यांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद मिळाले आहेत, असे ट्विट गडकरींनी केले.
खरे तर बाबूरावजी शतायुषी होतील, हा ठाम विश्वास होता, परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक व्रतस्थ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले याचे अतीव दु:ख आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो, अशी प्रार्थना गडकरी यांनी केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक, जेष्ठ संपादक आणि विचारवंत मा. गो. उपाख्य बाबूराव वैद्य यांना माझी विनम्र श्रद्धांजली. पूज्य गुरुजी यांच्यासह सर्व सरसंघचालकांसोबत काम करण्याचे, त्यांना जवळून अनुभवण्याचे भाग्य बाबुरावांना लाभले होते.
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) December 19, 2020
मा. गो. वैद्य हे परखड मतांसाठी ओळखले जात होते. ते तरुण भारतचे माजी मुख्य संपादक होते. वैद्य यांचे आज दुपारी दुपारी 3.30 वाजता निधन झाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते गेल्या काही काळापासून आजारी होते. यामुळे त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मा. गो. वैद्य यांची अंत्ययात्रा रविवार, 20 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता त्यांचे राहते घर- 80, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर-22 येथून निघेल. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होतील.