आर्थिक विकासासाठी विदर्भात नवीन मोठे उद्योग उभे राहावेत : नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 04:38 PM2022-03-07T16:38:13+5:302022-03-07T16:39:31+5:30
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित पत्रपरिषदेत नितीन गडकरी बोलत होते.
नागपूर : विदर्भात सर्व गोष्टींची मुबलकता असून वेगळी क्षमता आहे. मोठ्या उद्योगांसह त्यावर आधारित छोट्या उद्योगांची स्थापना व्हावी. त्याद्वारे विदर्भाचा मागासलेपणा दूर होऊन विदर्भ एक विकसनशील क्षेत्र म्हणून उदयास येईल. त्याकरिता खासदार औद्योगिक महोत्सव महत्त्वाचा ठरणार आहे. या माध्यमातून विदर्भात नवे उद्योग उभे राहतील आणि विदर्भाचा आर्थिक विकास व रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
खासदार औद्योगिक महोत्सवाच्या आयोजनासाठी आयोजित पत्रपरिषदेत गडकरी बोलत होते. खा. अशोक नेते, एमएसएमई-डीआय नागपूरचे संचालक प्रशांत पार्लेवार आणि एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. आयोजन एमएसएमई-डीआय नागपूरतर्फे करण्यात येत असून एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, व्हीआयए, कोसिया विदर्भ आणि सर्वच औद्योगिक संस्थांचे सहकार्य मिळत आहे.
उद्योजकांमध्ये ताळमेळ असावा
गडकरी म्हणाले, उद्योगात विदर्भाची पीछेहाट हा चिंतेचा विषय आहे. औद्योगिक विकासाचे वातावरण तयार व्हावे आणि युवा उद्योजक तयार होऊन रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण करण्याचा महोत्सवाचा उद्देश आहे. त्यामुळे मोठ्या उद्योगांवर आधारित छोटे उद्योग विदर्भात येतील. विदभराच्या आर्थिक विकासासाठी सर्वांना एकाच व्यासपीठावर आणायचे आहे. विदर्भातून फिनिश उत्पादनांसह कृषी उत्पादनांची थेट निर्यात करण्याचे लक्ष्य आहे. याकरिता सिंदी ड्रायपोर्ट उपयोगी आहे. सीएनजी व एलएनजी देशाचे भविष्य आहे. १६ मार्चला दिल्लीत हायड्रोजनवर कार धावणार आहे. खनिजांच्या मुबलकतेमुळे चंद्रपूर व गडचिरोलीत स्टील प्रकल्प उभे राहतील. विदर्भाच्या विकासासाठी १० वर्षांची योजना आखावी, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. महामेट्रो नागपूरच्या विस्तारित प्रकल्पाला केंद्राची लवकरच मंजुरी मिळेल, असे गडकरी म्हणाले.
तीन दिवसीय आयोजन
महोत्सवाचे आयोजन एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशन हाऊस, पी-२६, एमआयडीसी हिंगणा येथे १२ ते १४ मार्चपर्यंत होणार आहे. उद्घाटनप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित राहतील. महोत्सवात सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांचे १५० पेक्षा जास्त स्टॉल राहतील. इंजिनिअरिंग व मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी सेमिनार होणार आहेत.