वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण  करू नये; नितीन गडकरींचा जबर टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 05:04 PM2021-10-21T17:04:00+5:302021-10-21T17:32:03+5:30

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले, त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे व बेजबाबदारपणाचे आहे, असे गडकरी म्हणाले.

nitin gadkari reaction on vijay wadettiwars video | वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण  करू नये; नितीन गडकरींचा जबर टोला

वडेट्टीवारांनी बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण  करू नये; नितीन गडकरींचा जबर टोला

googlenewsNext

नागपूर : 'विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या संदर्भात आपण महाराष्ट्राचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) यांना मी कधीही, कोणतीही गोष्ट गुपचूप सांगितलेली नाही'. वडेट्टीवारांनी तशी वक्तव्ये करून बेजबाबदार आणि खोडसाळ राजकारण करू नये, असा टोला केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी लगावला आहे. 

नांदेड देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीच्यानिमित्ताने नांदेडमधे आयोजित प्रचारसभेत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात ३६ चा आकडा आहे. तसंच फडणवीस यांची जिरवायची होती, असं गडकरी यांनी आपल्याला सांगितलं असा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. त्यांच्या या विधानाला गडकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नितीन गडकरी यांनी आपल्याला गुपचूप काही तरी सांगितले, असे जे वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांच्या भाषणाची क्लिप पाहून मला आश्चर्य वाटले. त्यांचे वक्तव्य पूर्णतः निराधार, खोटे आणि बेजबाबदारपणाचे आहे, असे गडकरी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस माझ्यासाठी धाकट्या भावासारखे आहेत. शिवाय, ते माझ्या पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत. तसेच एकमेकांच्या विरोधात काड्या करणे आणि एकमेकांची जिरवणे ही काँग्रेसची परंपरा आहे. त्यामुळे तशा प्रकारचा संभ्रम काँग्रेसचे मंत्री वडेट्टीवार आमच्याही बाबतीत निर्माण करू पाहतात, असेही गडकरी यांनी म्हटले आहे. 

फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्राची प्रगती झाली. विरोधी पक्ष नेते म्हणूनही ते उत्तम काम करीत आहेत. महाविकास आघाडीच्या चुकांवर नेमके बोट ठेवून ते लोकशाहीतील विरोधकांचे कर्तव्य निभावत आहेत. हे सरकार तीन पक्षांचे असले तरी काँग्रेसमध्ये नैराश्य आहे. त्यांना कुणीही मोजत नाही. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी  वडेट्टीवार यांच्यासारखे काँग्रेसी नेते अशा प्रकारची वक्तव्ये करून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोपही गडकरी यांनी केला आहे.

Web Title: nitin gadkari reaction on vijay wadettiwars video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.