घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

By योगेश पांडे | Published: September 21, 2024 12:05 AM2024-09-21T00:05:04+5:302024-09-21T00:05:48+5:30

उमेदवाराने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असेही गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari said Nagpur Voters to do not vote for Dynasty Politics | घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर रोखठोक भाष्य करत जनतेनेच अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केले आहे. ज्यादिवशी लोक ठरवतील की वारसाहक्काने राजकारणात आलेल्यांना मतदान करायचे नाही, तेव्हा असे राजकारणी एका मिनिटात सरळ होतील, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.

नागपुरात आयोजित विश्व व्याख्यानमालेच्या आठव्या राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवाद कार्यक्रमात ते शुक्रवारी बोलत होते. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा. त्याला तिकीट द्या किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्यादिवशी जनता ठरवेल की वारसाहक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही तेव्हा असे लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा-मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. त्याने स्वत:ची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणूकीत उभे करा असे म्हटले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

यावेळी त्यांनी आयुर्वेदावरदेखील भाष्य केले. आयुर्वेदात आणखी संशोधनाची आवश्यकता असून औषधांचे स्टॅंडर्डायझेशन व्हायला हवे. औषधांच्या गुणवत्तेवर भर द्यायला हवा. आयुर्वेदिक डॉक्टर असूनदेखील ॲलोपेथीची प्रॅक्टिस काही लोक करतात. ही बाब योग्य नाही. आयुर्वेद हे भारतीय संस्कृती व स्वाभिमानाचे प्रतिक आहे. हिमालयातील वनस्पतींवर संशोधन व्हावे. आपल्या देशापेक्षा जर्मनीत आयुर्वेदावर जास्त काम सुरू आहे. आपल्या लोकांनीदेखील आयुर्वेदाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे, असे गडकरी म्हणाले.

Web Title: Nitin Gadkari said Nagpur Voters to do not vote for Dynasty Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.