गडकरीच नागपुरचे उमेदवार हवे; भाजप पदाधिकाऱ्यांची निरीक्षकांसमोर भूमिका

By योगेश पांडे | Published: February 29, 2024 09:00 PM2024-02-29T21:00:39+5:302024-02-29T21:01:55+5:30

नागपुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून त्यांची भूमिका जाणून घेतली.

nitin gadkari wants candidate from nagpur bjp office bearers role in front of observers | गडकरीच नागपुरचे उमेदवार हवे; भाजप पदाधिकाऱ्यांची निरीक्षकांसमोर भूमिका

गडकरीच नागपुरचे उमेदवार हवे; भाजप पदाधिकाऱ्यांची निरीक्षकांसमोर भूमिका

योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : लोकसभा निवडणूकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेच नागपुरचे उमेदवार हवे आहेत अशी स्पष्ट भूमिका भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मांडली. गुरुवारी पक्षाचे नागपूर लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक खा. मनोज कोटक व माजी खासदार अमर साबळे हे नागपुरात आले होते. त्यांनी नागपुरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून त्यांची भूमिका जाणून घेतली.

एकीकडे भाजपकडून जास्त जागा लढण्याची तयारी असल्याच्या चर्चा सुरू असताना मागील वेळी जिंकलेल्या २३ जागांसाठी पक्षाने निरीक्षक नेमले. संबंधित मतदारसंघात जाऊन तेथील पदाधिकारी, इच्छुक उमेदवारांशी चर्चा करून आढावा घेण्याची जबाबदारी या निरीक्षकांवर देण्यात आली आहे. याच प्रक्रियेत कोटक व साबळे नागपुरात आले होते. गुरुवारी दुपारी भाजप कार्यालयात शहरातील ७० प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते. भाजयुमोच्या महासंमेलनासाठी व्यस्त असल्याने ५५ पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. सुरुवातीच्या नियोजनानुसार निरीक्षक प्रत्येकाकडून एक फॉर्म भरून घेणार होते व त्यात कुणाला उमेदवारी दिलेली जास्त संयुक्तिक ठरेल अशी विचारणा होणार होती. त्यानंतर प्रत्यक्ष संवाद साधण्याचे ठरविण्यात आले. या बैठकीला आमदार, माजी आमदार, माजी खासदार, विधानसभा क्षेत्रप्रमुख, निवडणूक प्रमुख, प्रदेश महामंत्री इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमची भूमिका आम्ही शहराध्यक्षांना कळविली असून आमच्या वतीने तेच बोलतील असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी सर्वच पदाधिकाऱ्यांना नितीन गडकरी हेच उमेदवार म्हणून हवे असल्याचे सांगितले. दोन्ही निरीक्षकांनी शहरातील पक्ष संघटन, निवडणूकीची तयारी याबाबतदेखील धावता आढावा घेतला. ही भूमिका आता पक्षनेतृत्वाला कळविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: nitin gadkari wants candidate from nagpur bjp office bearers role in front of observers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.