नितीन गडकरींचे नागपूर विमानतळावर जल्लोषात स्वागत
By योगेश पांडे | Published: March 13, 2024 11:59 PM2024-03-13T23:59:42+5:302024-03-14T00:00:08+5:30
गडकरी यांचे पुत्र सारंग तसेच कुटुंबियांनीदेखील त्यांचे स्वागत केले.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकसभा निवडणुकीसाठी नागपुरातून उमेदवारी झाल्यानंतर ते रात्री नागपुरात पोहोचले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी विमानतळावर आ.कृष्णा खोपडे, आ.विकास कुंभारे, माजी आमदार अनिल सोले, शहराध्यक्ष बंटी कुकडे, विष्णू चांगदे प्रामुख्याने उपस्थित होते. गडकरी यांचे पुत्र सारंग तसेच कुटुंबियांनीदेखील त्यांचे स्वागत केले.
यावेळी विमानतळावर कार्यकर्त्यांनी डीजे व ढोल ताशे वाजवले. त्याचप्रमाणे फटाकेदेखील फोडण्यात आले. पहिल्या यादीत गडकरी यांचे नाव नसल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून यावरून वक्तव्यदेखील करण्यात आली होती. मात्र बुधवारी जाहीर झालेल्या यादीत गडकरी यांचे नाव आले आणि त्यांच्या समर्थकांनी त्यानंतर शहरात विविध ठिकाणी जल्लोष केला.