नितीन गडकरींचे माजी स्वीय सहाय्यक झाले भाजपाचे निवडणूक संयोजक
By योगेश पांडे | Published: December 21, 2023 05:50 PM2023-12-21T17:50:27+5:302023-12-21T17:50:36+5:30
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र जारी केले.
नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे माजी स्वीय सहाय्यक सुधीर देऊळगावकर यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. त्यांना राज्यपातळीवरील मोठी जबाबदारी देण्यात आली असून पुढील निवडणूकांत त्यांची मोठी भूमिका राहणार आहे.
यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र जारी केले. देऊळगावकर यांना भाजपच्या निवडणूक विभाग प्रदेश संयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या दृष्टीने भाजपने राज्यभरात संघटन बळकटीवर भर दिला आहे.
निवडणूकांदरम्यान प्रचार नियोजन, प्रत्यक्ष प्रचार, आचारसंहितेचे पालन याच्यासह विविध बाबींसाठी भाजपकडून सखोल नियोजन करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने देऊळगावकर यांची नियुक्ती महत्त्वाची मानण्यात येत आहे. देऊळगावकर हे नितीन गडकरी यांचे अनेक वर्ष स्वीय सहाय्यक होते. काही वर्षांअगोदर व्यक्तिगत कारणांमुळे त्यांनी ती जबाबदारी सोडली होती. त्यानंतर त्यांनी विविध सामाजिक उपक्रमदेखील राबविले होते. देऊळगावकर यांनी याअगोदरदेखील निवडणूकांशी निगडीत कामे हाताळली असल्याने त्यांची निवड झाल्याचे मानण्यात येत आहे.