टाटा समूहाने मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारावे; नितीन गडकरींचे नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2022 10:57 AM2022-12-01T10:57:46+5:302022-12-01T10:58:45+5:30

लॉजिस्टिक्स, डाटा सेंटर्समध्ये गुंतवणूक करण्याची संधी

Nitin Gadkari's letter to Natarajan Chandrasekaran for Tata Group to set up aviation hub in Mihan, Nagpur | टाटा समूहाने मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारावे; नितीन गडकरींचे नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र

टाटा समूहाने मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारावे; नितीन गडकरींचे नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र

Next

नागपूर : टाटा-एअरबसचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नसल्याचे स्पष्ट झाले असतानादेखील टाटा समूहाची नागपुरात गुंतवणूक यावी यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी टाटा सन्स लिमिटेडचे चेअरमन नटराजन चंद्रशेखरन यांना पत्र लिहून नागपुरातील मिहानमध्ये एव्हिएशन हब उभारण्यासोबतच विविध क्षेत्रांत गुंतवणुकीची संधी असल्याचे प्रतिपादन केले आहे.

याअगोदर गडकरी यांनी ७ ऑक्टोबर रोजी चंद्रशेखरन यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर चंद्रशेखरन यांनी टाटा समूह मिहानमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे पत्र लिहिले होते. १६ नोव्हेंबर रोजी गडकरी यांनी परत चंद्रशेखरन यांना पत्र लिहून मिहानमध्ये गुंतवणुकीच्या कोणत्या संधी आहेत यावर प्रकाश टाकला आहे.

नागपूर विमानतळाचा रनवे मिहानशी जोडल्या गेला आहे. त्यामुळे येथे अत्याधुनिक एव्हिएशन हब उभारल्या जाऊ शकते. याशिवाय डोमेस्टिक व आंतरराष्ट्रीय उत्पादनांच्या एअर कार्गो बिझनेससाठी मोठे हब उभारणे फायदेशीर ठरू शकते, असे गडकरी यांनी पत्रात नमूद केले आहे. टाटा समूहाच्या विविध औद्योगिक व वाणिज्यिक गरजा पूर्ण करणारे डेटा सेंटरदेखील नागपुरात निर्माण केले जाऊ शकते. सोबतच टाटाच्या ग्राहक उत्पादने, फार्मसी, स्टार्टअप्स इत्यादीसाठी ऑपरेशन हब उभारण्यासाठी नागपूर योग्य केंद्र ठरेल, असे गडकरी यांनी म्हटले आहे.

नागपुरातील संधींचे मूल्यमापन करून टाटा समूहाने त्यादृष्टीने पावले उचलत प्रमुख अधिकाऱ्यांना नागपूरला अभ्यासासाठी पाठवावे, असे गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे. राज्य व केंद्र शासनाकडून पूर्ण सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासनदेखील त्यांनी या पत्राच्या माध्यमातून दिले आहे.

टीसीएसचा विस्तार करावा

नागपुरात टीसीएस अगोदरपासूनच कार्यरत आहे. नागपुरात उपलब्ध पायाभूत सुविधा, दरवर्षी विदर्भातून बाहेर पडणारे अभियांत्रिकी पदवीधर या गोष्टी लक्षात घेता टीसीएसचा याचा आणखी विस्तार होऊ शकतो. अभियंत्यांना योग्य प्रशिक्षण दिले तर टाटाला कमी खर्चात कुशल मनुष्यबळ मिळू शकेल, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय नागपुरात पंचतारांकित हॉटेलमध्येदेखील गुंतवणूक केली जाऊ शकते, असे पत्रात नमूद आहे.

Web Title: Nitin Gadkari's letter to Natarajan Chandrasekaran for Tata Group to set up aviation hub in Mihan, Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.