अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे - नितीन गुप्ता
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 5, 2023 06:51 PM2023-04-05T18:51:34+5:302023-04-05T18:52:14+5:30
अधिकाऱ्यांनी करदाते आणि सरकारमधील दुवा म्हणून काम करावे असे नितीन गुप्ता यांनी म्हटले.
नागपूर : देशाच्या विकासात आवश्यक कर संकलनात अनेक आव्हाने येतील, पण त्यावर मात करीत पुढे जा आणि यशस्वी व्हा. नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब आणि करदात्यांना सुलभ सेवा प्रदान करताना तुम्ही करदाते आणि सरकारमधील दुवा बनून कार्यरत राहण्याचे आवाहन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, नवी दिल्लीचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी येथे केले.
भारतीय महसूल सेवेच्या ७५ व्या बॅचचा दीक्षांत समारंभ बुधवारी छिंदवाडा रोड येथील राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सभागृहात पार पडला. समारंभात मुख्य अतिथी म्हणून गुप्ता बोलत होते. मंचावर राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीचे प्रधान महासंचालक (प्रशिक्षण) संजय पुरी, यांच्यासह एनएडीटीचे अप्पर महासंचालक (प्रशासन) मुनीश कुमार, अप्पर महासंचालक (प्रशिक्षण) बी. व्यंकटेश्वर राव, अप्पर महासंचालक, डॉ. विनय कुमार, अप्पर संचालक एम. कार्तिक माणिक्कम आणि संयुक्त संचालक व ७५ व्या बॅचचे कोर्स संचालक सौरभ अग्रवाल उपस्थित होते.
अधिकाऱ्यांसमोर कर संकलन वाढीची आव्हाने
गुप्ता म्हणाले, अमृतकाळाच्या पहिल्या टप्प्यात तुम्ही अधिकारी म्हणून रूजू होणार आहात. कर संकलन वाढीची आव्हाने आहेत. विभागाने अनेक महत्त्वाची पाऊले उचलली आहेत. तंत्रज्ञानात बदल होत आहे. त्यामुळे दरवर्षी महसूल वाढत आहे. अनेक लोक कर टप्प्यात येत आहेत. करदात्यांना अनुपालन सुलभ करणारी धोरणे आणि प्रक्रिया सुलभ केल्यामुळे आयकर विभागाने ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात आतापर्यंतचे सर्वाधिक १६.०६ लाख कोटी रुपयांचे कर संकलन नोंदवले आहे. रिटर्न फायलिंग करण्याची अखेरची तारीख ३१ जुलै आहे. याआधी एकाच दिवशी ७२ लाख रिटर्न फाईल झाले होते.
आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करा
गुप्ता म्हणाले, गेल्या काही दशकांपासून कामाच्या पद्धतीत बदल झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंक करणे महत्त्वाचे ठरणार आहे. वर्ष १९८६ मध्ये आयकर संकलन ७ हजार कोटी होते. ते आता १६.६ लाख कोटींवर पोहोचले आहेत. कर वाढीसाठी आयआरएस अधिकारी महत्त्वाचे ठरले आहेत. कामाच्या पद्धतीत बदल झाला आहे. ई-गर्व्हनन्स आले आहे. ई-फायलिंगची पद्धत संगणकीकृत झाली आहे. २०१९ मध्ये फेसलेस पद्धत आली. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये पोर्टलद्वारे ७.५ कोटी रिटर्न फाईल झाल्या आहेत. विभागाच्या कार्यपद्धती अनेक बदल केले जात आहेत. आयआरएसला देशात आणि देशाबाहेरही संधी आहेत. त्यांना अनेक विभागात काम करता येते, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.